Published On : Mon, Jan 31st, 2022
By Nagpur Today Nagpur News

सीताराम कुंटे यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे वास्तव समोर आले : आ. बावनकुळे

Advertisement

नागपूर: राज्याच्या गृह खात्यात वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या प्रकरणात झालेल्या घोटाळ्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर केलेल्या गौप्यस्फोटामुळे या प्रकरणाचे वास्तव समोर आले असून कुंटे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करूनच हा गौप्यस्फोट केला असावा, असे मत आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार कुंटे यांना तशा सूचना मुख्यमंत्र्यांकडून असाव्यात असे सांगताना आ. बावनकुळे म्हणाले- आयएएस आणि आयपीएस अधिकार्‍यांच्या बदल्या करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. त्याखालील बदल्या पोलिस महासंचालक व अन्य समितीला आहेत. पण तत्कालीन गृहमंत्र्यांनी त्यांना करावयाच्या बदल्या कागदावर लिहून यादी करून संबंधितांकडे दिल्या. कोणत्या पदावर, कोणत्या गावाला, अधिकार्‍याचे नाव असे सर्वच कागदावर लिहून दिले. हे सर्व होत असताना मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार यांना माहीत नाही असे म्हणता येत नाही. मुख्य सचिव म्हणून नव्हे तर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून त्यांनी ही माहिती सक्तवसुली संचालनालयासमोर सांगितली आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी त्यांना सर्व माहीत असताना वस्तुस्थिती सर्वांसमोर आणायला हवी होती. पण या प्रकरणाची माहिती त्यांना असूनही त्यांनी त्याची दखल घेतली नाही, असेही आ. बावनकुळे म्हणाले.

राऊत यांना बोलण्याचा अधिकार नाही खा. संजय राऊत यांना वाईनची किराणा दुकानात विक्रीला परवानगी या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही, असे सांगताना आ. बावनकुळे म्हणाले- तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासनाच्या काळात भाजप शिवसेनेचे सरकार होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन दारु विक्रीला परवानगी नाकारली होती. मी त्यावेळी उत्पादन शुल्क मंत्री होतो. मी पण तो प्रस्ताव नामंजूर केला. त्यावेळी शिवसेनेचे अनेक लोकप्रतिनिधी ऑनलाईन दारुविक्रीला परवानगी देण्याच्या मागणीसाठी माझ्याकडे आले होते. त्यामुळे संजय राऊत यांच्या आजच्या भूमिकेला काही अर्थ उरत नाही. स्वस्त प्रसिध्दीसाठी ते काहीही बोलत असतात.

वाईन म्हणजे दारू नाही, याची माहिती अजित पवारांनाच माहीत. पण त्यांना हे बोलणे शोभत नाही. बेजबाबदार वक्तव्य पवारांनी करू नये. शेतकर्‍यांच्या नावाखाली कुण्या एकाला फायदा पोचवण्यासाठी हा निर्णय घेतला हे आम्ही नंतर स्पष्ट करून पण सध्या तर शेतकर्‍यांची व जनतेची दिशाभूल केली जात असल्याचेही आ. बावनकुळे म्हणाले.

Advertisement

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गांधीजींची हत्या म्हणण्याऐवजी ‘वध’ असा शब्दप्रयोग केला, यावर बोलताना आ. बावनकुळे म्हणाले- मि. नटवरलाल पटोले यांना मनोरुग्णालयात पाठवावे. त्यांनी औषधोपचार सुरु करावा. जाणीवपूर्वक ते वादग्रस्त वक्तव्य करीत असतात. त्यामुळे काँग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन होत आहे. काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांनी त्यांना पदावरून हटवावे, असेही आ. बावनकुळे म्हणाले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.