मुंबई: : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस निमित्ताने ‘रन फॉर युनिटी’या दौडीचा प्रारंभ राज्यपाल चे. विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एनसीपीए येथून करण्यात आला.
या कार्यक्रमास मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार संजय काकडे, आमदार राज पुरोहित, मुख्य सचिव सुमित मल्लिक उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल महोदय यांनी इंग्रजी भाषेत उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी मराठीमध्ये शपथ दिली. दौडमध्ये विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, एन.सी.सी., एन.एस.एस. चे विद्यार्थी, भारत स्काऊट गाईडचे विद्यार्थी, विविध जिमखान्यांचे खेळाडू, शासकीय कार्यालयाचे कर्मचारी, विविध बँका तसेच नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मरीन ड्राईव्हमार्गे दौडचा समारोप शेवटी ग्रँट मेडिकल जिमखाना येथे झाला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाची अखंडता राखण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. आज त्यांच्या नावाने संपूर्ण देशभरात ‘रन फॉर युनिटी’दौड आयोजित केली जात आहे. ही धाव राष्ट्रीय एकतेला, एकात्मतेला समर्पित आहे. सर्व वयोगटातील नागरिक यामध्ये सहभागी होऊन हा देश एक राहील, देशाची अखंडता कोणीही दूर करू शकत नाही अशा प्रकारचा संदेश या दौडीच्या माध्यमातून देण्यात आला आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
कार्यक्रमास बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव भगवान सहाय, जिल्हाधिकारी संपदा मेहता उपस्थित होत्या.
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त राज्यपालांचे सचिव बी वेणुगोपाल रेडडी यांनी आज राजभवन मधील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना एकता, अखंडता आणि सुरक्षा राखण्याची शपथ दिली तसेच माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने राष्ट्रीय संकल्प दिवस देखिल आज राजभवन मुंबई येथे साजरा करण्यात आला.