Published On : Wed, Jan 2nd, 2019

धुक्यामुळे विमानांना तासांपर्यंत उशीर

नागपूर : दिल्लीसह देशातील अन्य शहरांमध्ये धुके आणि खराब हवामानामुळे अन्य शहरातून नागपुरात येणारी दहा विमाने अनेक तासांपर्यंत उशिरा आलीत. काही विमानांना तीन तासांपर्यंत उशीर झाला. बदलत्या वातावरणाचा परिणाम सकाळच्या विमानांवर सर्वाधिक झाला.

बेंगळुरू येथून नागपुरात सकाळी ७.३० वाजता येणारे एअर एशियाचे विमान एक तास उशिरा आले. ७.४० वाजता नागपुरात पोहोचणारे एअर इंडियाच्या विमानाला ४४ मिनिट उशीर तर गो-एअरचे पुणे येथून नागपुरात येणारे विमान चार तास उशिरा पोहोचले. याशिवाय बेंगळुरू येथून सकाळी ७.४५ वाजता येणारे विमान ५२ मिनिटे, सकाळी १० वाजता मुंबईहून नागपुरात येणारे इंडिगोचे विमान १.१५ तास, १२.१५ वाजताचे एअर एशियाचे कोलकाता-नागपूर विमान ५५ मिनिटे, सायंकाळी ५.३० वाजता येणारे मुंबईचे विमान ४६ मिनिटे आणि ७.३५ वाजता दिल्लीहून येणारे गो-एअरचे विमान नागपुरात ४३ मिनिटे उशिरा पोहोचले.

अनेक विमानांना तासांपर्यंत उशीर झाल्यामुळे प्रवाशांच्या शेड्युलवर परिणाम झाला. नागपुरातील अधिकांश प्रवासी दिल्ली आणि मुंबईला सकाळी जाऊन सायंकाळी परत येतात. अशा स्थितीत अनेक प्रवाशांचे काम विमानांना उशीर झाल्यामुळे झाले नाही.