नागपूर : सीमा शुल्क विभागाने नागपूर विमानतळावरून तब्बल ८ कोटी ८१ लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहे. अमली पदार्थ तस्करी विरोधात सुरू असलेल्या मोहिमेतील ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती समोर आली आहे.
या कारवाईअंतर्गत एकाला अटक करण्यात अली असून तो तामिळनाडू येथील रहिवासी आहे. तो युगांडाहून दोहा मार्गे कतार एअरवेची फ्लाइट क्र QR-590 ने गुरुवारी पहाटे नागपूर विमानतळावर आला होता.
कस्टम अधिकाऱ्यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. अधिकाऱ्यांनी सापळा रचून आरोपीला ग्रीन चॅनलवरून जात असताना अडविले.
त्याची झाडाझडती घेतली असता, त्याच्याजवळ तब्बल २ किलो ९३७ ग्रॅम अमली पदार्थ (ड्रग्स) आढळून आले.आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किमत ८ कोटी ८१ लाख रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे.याप्रकरणी कस्टम अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.