Published On : Sat, Sep 19th, 2020

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या पायाभरणी समारंभात महाविकास आघाडी सरकारचे राजकारण

भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांचा आरोप

नागपूर: दादर येथील इंदू मिलच्या जागेवर होत असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागतिक दर्जाच्या स्माराकाच्या पायाभरणी समारंभात महाविकास आघाडी सरकार राजकारण करीत आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव तथा नागपूर महानगरपालिकेचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

इंदू मिलच्या जागेवर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. त्यानंतर स्मारकस्थळी बहुतांशी कामही झाले आहे. अशात अचानक बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या पायाभरणी कार्यक्रमाची घोषणा केली जाते व लगेच तो कार्यक्रम रद्दही केला जातो. ही नामुष्की सरकारवर येणे ही लाजीरवाणी बाब असून राज्यातील महाविकास आघाडी सरकार डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकासंदर्भात राजकारण करीत आहे.


महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर काटोल येथील ‘अरविंद बंसोड हत्या प्रकरण’ असेल किंवा जालन्या जवळील पाणशेंद्रा येथील दोन दलीत बांधवांची हत्या असेल, अशा बाबींपासून लक्ष विचलीत करण्यासाठीचा हा बनाव आहे, असा आरोप देखील भाजपा प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केला आहे.

इंदूमिलच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक दर्जाचे स्मारक व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्रजी फडणवीस यांनी ती जागा मिळवून दिली. यापूर्वीच्या सरकारला ही जागा मिळवून देता आली नाही मात्र पंतप्रधान मोदी यांनी त्या जागेवरील स्मारकाचा मार्ग मोकळा केला. स्मारकाचे भूमिपूजनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला डॉ.बाबासाहेब आंबेडकारांचे बहुसंख्य अनुयायांसह चळवळीतील नेते आदी सर्वच त्यावेळी उपस्थित होते. मात्र आता अचानक पायाभरणी कार्यक्रम घेण्यात आला आहे. ही पायाभरणी कोणत्या स्वरूपाची आहे, त्याचीही कुणाला कल्पना नाही. महाविकास आघाडी सरकारला पुन्हा पायाभरणी करण्याची इच्छा असेल तर ती जाहिररित्या करावी ती लपून छपून करू नये. ती उघडपणे करावी. सरकारमधील मंत्र्यांनाही त्याची माहिती देण्यात आली नसल्याची माहिती पुढे आली आहे.

अशाप्रकारे लपूनछपून कार्यक्रम करण्याची गरज नाही. सरकारला श्रेय घेण्यासाठी पुन्हा कार्यक्रम करायचे असेल तर तो उघडपणे करावा. यामध्ये सर्वांना आमंत्रित करावे. बाबासाहेबांचे वैश्विक स्मारक हे प्रेरणास्त्रोत आहे. त्याचा कोणताही समारंभ हा उघडपणेच व्हावा. अशाप्रकारे लपूनछपून कार्यक्रम घेणे व तो पुन्हा रद्द करणे हे योग्य नाही. एकीकडे राज्यात होणा-या दलित बांधवांच्यावरील अत्याचारा संदर्भात न्याय मागितले जात आहे. वारंवार सरकारकडे न्यायाची मागणी केली जात आहे. मात्र त्याकडे सरकार साफ दुर्लक्ष करीत आहे. दुसरीकडे पायाभरणीच्या कार्यक्रमाचा मुद्दा बनवून दलितांच्या अत्याचाराच्या घटनांवरून लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे, ही दुट्टपी भूमिका दलित विरोधी आहे, असाही घणाघात ॲड.धर्मपाल मेश्राम यांन केला आहे.

राज्यात सत्तेत असताना भारतीय जनता पार्टी सरकारने स्मारकासंदर्भातील सर्व अडचणी आधीच दूर केल्या आहे. महापरिनिर्वाण दिनी मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्यांनाही या स्मारकाचे दर्शन घेता यावे. यासाठी याबाबत राजकारण न करता कामाच्या गतीकडे लक्ष द्यावे, असेही ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.