Published On : Mon, Dec 2nd, 2019

डॉ. नितीन राऊत यांची दीक्षाभूमीला भेट

नागपूर : कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतलेले डॉ. नितीन राऊत यांचे आज दुपारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी विमानतळावर कार्यकर्त्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. त्यानंतर विमानतळावरुन डॉ. नितीन राऊत यांचे कार्यकर्त्यांच्या रॅलीसह दीक्षाभूमीला आगमन झाले. तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास डॉ. राऊत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

दीक्षाभूमीवरील बौध्दस्तूपाच्या आतील तथागत गौतमबुध्द यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाला अभिवादन करुन सामूहिकरित्या बौध्द वंदना करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पत्रकार बांधवांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, सुधीर फुलझेले, आर.एन.सुटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य आर.व्ही.पाटील आदी उपस्थित होते.

दीक्षाभूमी येथून कार्यकर्त्यांसह निघून डॉ. नितीन राऊत यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर कामठी रोड येथील इंदोरा बुध्द विहार येथे बुध्दीस्‍ट टेंपलला भेट देवून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरला आल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून भव्य स्वागत केले.