Published On : Tue, Oct 10th, 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानतर्फे क्रिकेटपटू मोना मेश्रामला 11 लाख रुपये

नागपूर: सामाजिक न्याय विभागाअंतर्गत नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता खेलरत्न पुरस्कार आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू कुमारी मोना राजेश मेश्रामला सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्या हस्ते देण्यात आला.

सामाजिक न्याय भवन येथे नुकतेच समता खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कारामध्ये 11 लाख रुपयाचा धनादेश, मानचिन्ह, यांचा समावेश आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या संकल्पनेतून सामाजातील दुर्बल घटकासाठी कार्य करणारा सार्वजनिक उपक्रम म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानची स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धम्मचक्र प्रवर्तन दिन समता प्रतिष्ठानची सुरुवात झाली आहे.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू कुमारी मोना राजेश मेश्राम यांचे प्रतिष्ठानच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी समाजकल्याण आयुक्त मिलींद शंभरकर, बार्टीचे महासंचालक राजेश डाबरे, प्रादेशिक आयुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड,कास्ट्राईबचे प्रमुख कृष्णा इंगळे, सहायक आयुक्त विजय वाकुलकर तसेच दलित मित्र, समाजभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती मोठया संख्येने उपस्थित होते.