Published On : Sat, Apr 14th, 2018

बाराचा ठोका अन् भीम जल्लोष

Advertisement


नागपूर: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रौप्य महोत्सवानिमित्त जयंतीच्या पूर्वसंध्येला इंदोरा बुद्ध विहार येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. आंतरराष्टÑीय धम्मगुरू व धम्मसेनानायक भदंत आर्य नागार्जून सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात निघालेल्या या रॅलीत भीम व बुद्ध गीतांवर आंबेडकरी तरुणाईने एकच ताल धरला. शहरातून वेगवेगळ्या ठिकाणांहून अनेक मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुका (रॅली) संविधान चौकात एकत्र आल्या. निळ्या गुलालाची उधळण करीत ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीने संविधान चौक अक्षरश: दणाणून गेला. आज शुक्रवारी रात्री १२ च्या ठोक्याला फटाक्यांची प्रचंड आतषबाजी झाली आणि कधी नव्हे असा जोश आणि जल्लोष चौकाने अनुभवला. तरुणाई केवळ जल्लोष करून थांबली नाही, तर घटनाकार बाबासाहेबांचा जल्लोष पहाटेपर्यंत कायम आणि सुरूच होता, हे विशेष.

इंदोरा बुद्ध विहार कमिटी, अखिल भारतीय धम्मसेना आणि बेझनबाग बुद्ध विहारातर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ९.३० वाजता इंदोरा बुद्धविहार येथे बुद्धवंदनेने मिरवणुकीला प्रारंभ झाला. ढोल-ताशे आणि फटाक्यांची आतषबाजीसह ही रॅली इंदोरा चौकात पोहोचली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केल्यानंतर दहा नंबर पूल, कडबी चौक, गड्डीगोदाम, एलआयसी चौक असे मार्गक्रमण करीत रॅली संविधान चौकात पोहोचली. महामानवाच्या जयघोषाने कामठी मार्ग अक्षरश: दणाणून गेला होता. हजारोंच्या संख्येने उपासक-उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करीत मिरवणुकीत सहभागी झाले होते. पंचशील ध्वज सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. भीम-बुद्ध गीतांवर तरुण-तरुणी व अबालवृद्धांनीसुद्धा ताल धरला.

पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण व मध्य भागातून मिरवणूक निघताना जिकडे-तिकडे जोश व जल्लोषच दिसत होता. प्रत्येकाच्याच चेहºयावर जयंतीचा आनंद ओसंडून वाहत होता. जल्लोषात ही मिरवणूक १२ च्या ठोक्याला संविधान चौकात पोहोचताच फटाक्यांची आतषबाजी झाली. यासोबतच शहरातील विविध बुद्धविहार, संघटना, व सामाजिक संस्थांतर्फेही रॅली काढण्यात आली. शहरातील चारही बाजूंनी निघालेल्या मिरवणुका संविधान चौकात पोहोचल्या. चौकातील महामानवाच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी संपूर्ण चौक गर्दीने फुलून गेला होता. हजारो वर्षांपासून गुलामगिरीच्या खाईत खितपत पडलेल्या लाखो दीनदलितांसाठी उत्थानाचा मार्ग प्रशस्त करून देणाºया महामानवाविषयी प्रत्येक अनुयायाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव दिसून आले. यावेळी भदन्त ससाई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्रिशरण पंचशीलाने रॅलीचा समारोप झाला. मिरवणुकीत भंते नागघोष, भंते नागधम्म, भंते नागसेन, भंते धम्मबोधी, भंते नागानंद, भंते धम्मकाया, भंते धम्मविजय, धम्मप्रकाश, भंते शिलानंद, संघमित्रा, संघशिला, यांच्यासह उपासक-उपासिका आणि हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले होते.


पहाटे तीनपर्यंत जल्लोष कायम

महामानव बाबासाहेबांची उद्या मोठ्या प्रमाणात, धुमधडाक्यात जयंती साजरी करण्यात येणार आहे. पण, जयंतीच्या पूर्वसंध्येला मिरवणुका काढून रात्री १२ वाजता अनुयायी हजारोंच्या संख्येने संविधान चौकात एकत्र आले. बाराच्या ठोक्याला सर्वांनीच बाबासाहेबांचा जयघोष केला. पण, जयघोष करून अनुयायी निघून गेले नाही तर पहाटे ३ वाजेपर्यंत अनुयायी चौकात उपस्थित होते. तोच उत्साह आणि तोच जल्लोष सर्वांच्याच चेहºयावरून ओसंडून वाहत होता, हे येथे उल्लेखनीय.

शहरात सर्वत्र जयंतीफलक व कमानीही उभारल्या
बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, संस्था, संघटना तयार आहेत. संपूर्ण शहरवासियांमध्ये प्रचंड उत्साह असून, शहरातील लहान-मोठ्या चौकात जयंती शुभेच्छांचे फलक, बॅनर लागले आहेत. ठिकठिकाणी भल्यामोठ्या कमानीही उभारण्यात आल्या आहेत. दीक्षाभूमीसह शहरात सर्वत्र विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.