Published On : Thu, Apr 16th, 2020

सात दिवसांत साडे तीन हजारांवर नागपूरकरांनी डाऊनलोड केले ‘नागपूर लाईव्ह सिटी ॲप’

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा पुढाकार : तक्रारींची सोडवणूक आता एका ‘क्लिक’वर

नागपूर : कार्यालयाच्या फेऱ्या न मारता लोकांना एका क्लिकवर त्यांच्या समस्यांचे समाधान भेटायला हवे, या उद्देशातून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढकाराने तयार करण्यात आलेल्या ‘नागपूर लाईव्ह सिटी’ ॲपला आठवडाभरातच प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ सात दिवसांत सुमारे साडे तीन हजार नागपूरकरांनी ॲप डाऊनलोड केले असून आतापर्यंत ७०० च्या वर तक्रारी ॲपच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत.

विशेष म्हणजे प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी अर्ध्यांपेक्षा अधिक तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. त्याची माहितीही संबंधित नागरिकांना ॲपच्या माध्यमातूनच देण्यात आली. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सात दिवसांपूर्वी समस्त नागपूरकरांसाठी ‘नागपूर लाईव्ह सिटी’ ॲप लॉन्च केले. नागपूर शहरातील कुठल्याही व्यक्तीला मुलभूत सोयीसुविधांविषयी कुठलीही तक्रार असेल तर सदर ॲपच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. सदर ॲप सध्या ॲन्ड्रॉईड यूजर्ससाठी असून प्ले-स्टोअरमधून ते डाऊनलोड करता येईल अथवा http://www.nmcnagpur.gov.in/grievance या लिंकवरून पोर्टलला भेट देता येईल. या ॲपमुळे आता नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू नोंदणी, धोकादायक इमारती, रस्त्यावर पडलेली झाडे, मलवाहिनी, उद्यान आदींसंदर्भातील तक्रारी ॲपच्या माध्यमातून करण्याची सोय आता मनपाने उपलब्ध करून दिलेली आहे.


केवळ सात दिवसांत ३६०० नागपूरकरांनी ॲप डाऊनलोड केले आहे. सरासरी प्रति दिवस ५०० नागपूरकर ॲप डाऊनलोड करीत असून प्रति दिवस १०० तक्रारी प्राप्त होत आहेत. आतार्पंत एकूण ७५२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४१९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे ॲपच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींवर खुद्द मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नियंत्रण असून दररोज याचा ते आढावा घेतात. संबंधित तक्रारींची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांना दिली असून निर्धारीत वेळेच्या आत तक्रारीचे निराकरण झाले नाही तर ॲपच्या माध्यमातूनच संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस जाते. हे ॲप नागरिकांसाठी उपयुक्त असून नागरिकांनी तक्रारींचे निराकरण करण्यासाठी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.