Published On : Fri, Apr 17th, 2020

कोरोनाला घाबरू नका, मनपा करणार आता समुपदेशन

Advertisement

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा पुढाकार : समुपदेशनासाठी तज्ज्ञांची चमू

नागपूर: कोव्हिड-१९ च्या रुपाने आलेल्या संकटाने संपूर्ण देश हादरला आहे. यामुळे नेमके काय होईल, किती दिवस लॉकडाऊनमध्ये जाणार आहेत, नोकरी तर जाणार नाही ना, आर्थिक आधार तर खचणार नाही, अशा अनेक शंका आणि त्यामुळे भीती निर्माण होते. त्यामुळे ही भीती घालविण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून आता नागपूर महानगरपालिकेचे तज्ज्ञांची चमू आणि प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशन करणार आहेत.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एकीकडे कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आरोग्य विभागासोबतच मनपाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज उभारली आहे. विषाणूशी लढा देतानाच दुसरीकडे सामाजिक दायित्वही गरजूंना, बेघरांना मदत पोहचवून निभावत आहे. लॉकडाऊनदरम्यान शहरातील कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ नये याची काळजी घेण्यासाठी त्यांनी किराणा, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळेल अशी व्यवस्था केली. तर गरजूंना किराणा किट, निराधार ज्येष्ठ व्यक्ती, दिव्यांग, नागपुरात अडकलेले विद्यार्थी, मजूर आदींना समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दोन वेळेचे भोजन पुरविले जात आहे. नागरिकांच्या आरोग्यावर सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून बारिक नजर ठेवली जात आहे.

हे करीत असताना अनेकांच्या मनात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या लक्षात आले. एकीकडे आरोग्याची भीती आणि दुसरीकडे आर्थिक कंबरडे मोडण्याची भीती अशा दुहेरी शंकांमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे ओळखून त्यांनी मनपाच्या दहाही झोनमध्ये समाजकल्याण विभागाच्या मार्फत सुरू असलेल्या समुपदेशन केंद्राचा यासाठी उपयोग करवून घेण्याचे ठरविले.

त्यानुसार आता नागरिकांना अशी कुठली भीती मनात असेल तर त्यांनी मनपाच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून संपूर्ण माहिती द्यावी. तेथे उपस्थित डॉक्टरांची चमू नागरिकांचे समुपदेशन करेल. गरज पडल्यास झोनच्या चमूला संबंधित व्यक्तीच्या घरी पाठविण्यात येईल. याशिवाय अत्यंत आवश्यकता भासल्यास शहरातील प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञसुद्धा समुपदेशन करतील. नागरिकांनी या समुपदेशन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

समुपदेशनासाठी करा कॉल
कोव्हिड संदर्भातील भीती आणि अन्य शंका असतील तर समुपदेशनासाठी नागपूर महानगरपालिका नियंत्रण कक्षात दूरध्वनी करावा. ०७१२-२५६७०२१, ०७१२-२५६२४७४। ०७१२-२५६१८६६ या क्रमांकावर दूरध्वनी करून समुपदेशन सेवेचा लाभ घेता येईल.