Published On : Wed, Jun 4th, 2025
By Nagpur Today Nagpur News

मनपाच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ई-लायब्ररीतून घडताहेत डॉक्टर

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेची लोधीपुरा भागातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी ई-लायब्ररी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. त्याचबरोबर या ई-लायब्ररीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना एमबीबीएस, एमडी आणि एमएस सारख्या वैद्यकीय परीक्षांची तयारी करून डॉक्टर बनण्याची संधी मिळत आहे.

मे २०२२ मध्ये सुरू झालेली ही ई-लायब्ररी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. आणि शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी ठरली आहे. या लायब्ररीत यूपीएससी, एमपीएससी, सीए, एमबीए, बँक आणि इतर स्पर्धा परीक्षा तसेच सीईटीची तयारी करणारे विद्यार्थी अभ्यास करतात. गेल्या दोन वर्षांत काही विद्यार्थ्यांनी यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेतही यश मिळवले आहे, तर अनेक विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या आहेत. आता ही लायब्ररी ‘डॉक्टरांची लायब्ररी’ म्हणून ओळखली जात आहे. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रेल्वे रुग्णालयातील एमबीबीएस, एमडी आणि एमएसचे विद्यार्थी अभ्यासासाठी या लायब्ररीला सर्वाधिक पसंती देत असतात. लायब्ररीत प्रवेश देताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि कोणत्या परीक्षेची तयारी करत आहेत, याची माहिती घेतली जाते. यशस्वी विद्यार्थ्यांचा लायब्ररी कर्मचाऱ्यांकडून सत्कारही केला जातो. लवकरच या लायब्ररीमध्ये सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात येणार आहे, ज्यामुळे विजेची बचत होईल.

लायब्ररीत उपलब्ध सुविधा

Advertisement

या लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे ती अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे: शांत आणि वातानुकूलित (AC) वातावरण,लिफ्ट सुविधा,वीज खंडित झाल्यास जनरेटरची सोय,संगणक कक्ष आणि इंटरनेट, वायफाय सुविधा,दिव्यांगांसाठी विशेष अभ्यासिका आणि संगणक,विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी उपहारगृह, व्याख्यानांसाठी सभागृह, प्रशस्त पार्किंग अशी सुविधा आहे.

५० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रतीक्षेत

या लायब्ररीतील अभ्यासिकेत ३० विद्यार्थी बसू शकतात, तर कम्प्युटर लॅबमध्ये ६० अशी (१५ कॉमन संगणक, मुलांसाठी २०, मुलींसाठी २० आणि दिव्यांगांसाठी 5 संगणक) सुविधा उपलब्ध आहेत. दरमहा ५० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रतीक्षेत असतात. महानगरपालिकेकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांसाठी विद्यार्थ्यांकडून १००० रुपये प्रतिमहिना (कॅश किंवा ऑनलाईन) शुल्क घेतले जाते. या शुल्कात अभ्यासिका, इंटरनेट, वायफाय, पुस्तके आणि विविध मासिके यांचा समावेश आहे.

आरएफआयडी प्रणाली

पुस्तकांची चोरी रोखण्यासाठी लायब्ररीमध्ये रेडिओ फ्रिक्वेंसी आयडेंटीफिकेशन (RFID) प्रणा्ली बसवण्यात आली आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही पुस्तक बाहेर नेता येत नाही. ऑनलाइन नोंदणी असल्यामुळे कोणते पुस्तक कोणत्या विद्यार्थ्यांकडे आहे याची माहिती मिळत असल्याची माहिती या ई-लायब्ररीचे प्रभारी श्री. रितेश मेश्राम यांनी सांगितले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.