
नागपूर : महाराष्ट्राची शान असलेल्या सह्याद्री पर्वतरांगांमधील वृक्षतोडीविरोधात सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सह्याद्रीतील एकही झाड तोडू दिले जाणार नाही आणि सरकारने याबाबत ठोस भूमिका जाहीर करेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ‘सह्याद्री बचाओ’ या पर्यावरण संरक्षण मोहिमेअंतर्गत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी शिंदे यांनी राज्यातील वाढत्या वृक्षतोडीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रत्येक जिल्ह्यात किती झाडे लावली आणि किती झाडे तोडली, याचा हिशेब सरकारने जनतेसमोर मांडावा, अशी मागणी त्यांनी केली. माणूस झाडांमुळे जगतो, झाडे माणसांमुळे नाहीत. त्यामुळे विकासाच्या नावाखाली वृक्षतोड करण्याऐवजी कायद्यात आवश्यक बदल करून वृक्षसंवर्धनाला प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले.
राज्यात केवळ १७ टक्के जंगल शिल्लक असल्याचा दावा करत त्यांनी पर्यावरणाच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली. ‘महाराष्ट्राची शान असलेल्या सह्याद्रीला वाळवंट बनवायचे आहे का?’, असा सवाल त्यांनी सरकारला केला. दिवाळी जवळ आली असताना सह्याद्रीची मात्र होळी होत आहे, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. हा केवळ वृक्षतोडीचा प्रश्न नसून मोठा जंगल घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘आईनंतर आपल्याला जगवणारे झाड आहे’, असे सांगत नागरिकांनी वृक्षसंवर्धनासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, सह्याद्रीच्या संरक्षणासाठी आज, सोमवार २ नोव्हेंबर रोजी नागपुरात थाळी बजाओ आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ज्या सह्याद्रीने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या उभारणीत साथ दिली, त्याच सह्याद्रीवर आज कुऱ्हाड चालवली जात असल्याची भावना व्यक्त करत नागपूरकरांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आंदोलनाचा तपशील :
ग्रीन नागपूरच्या वतीने आयोजित हे आंदोलन आज सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत संविधान चौक (आरबीआय स्क्वेअर), नागपूर येथे होणार आहे. या आंदोलनात अभिनेते सयाजी शिंदे उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी घरून ताट आणि चमचा सोबत आणण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. ‘आता गप्प बसलात तर उद्या पाणी आणि श्वासही गमवावा लागेल’, असा इशारा देत सह्याद्री वाचवण्यासाठी एकजुटीने आवाज उठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



