
वर्धा : कामात हलगर्जीपणा आणि निकृष्ट दर्जा खपवून घेतला जाणार नाही, हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथे आयोजित कार्यक्रमात महामार्गाच्या कामाबाबत तक्रारी समोर येताच गडकरी यांनी संबंधित कंत्राटदाराची चांगलीच कानउघाडणी केली. ‘एवढे खराब काम केले आहे, थोडी तरी लाज वाटली पाहिजे. फुकटचे पैसे पाहिजेत का?’ अशा शब्दांत त्यांनी कंत्राटदाराला सुनावले.
सिंदी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून लॉजिस्टिक पार्क उभारण्याच्या प्रकल्पासाठी खासगी कंपनीसोबत करार करण्यात आला. या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, माजी खासदार रामदास तडस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. याचदरम्यान एका महामार्गाच्या कामातील त्रुटी आणि तक्रारी गडकरी यांच्या कानावर आल्या. त्यांनी तातडीने संबंधित कंत्राटदाराला बोलावून त्याच्या कामाचा जाब विचारला. यापुढे कामासाठी अर्ज करू नका, तसेच दिल्लीत गेल्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, अशी ताकीदही दिली.
दुसरीकडे, सिंदी येथील प्रस्तावित लॉजिस्टिक पार्कमुळे विदर्भाच्या व्यापार आणि निर्यात क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असे गडकरी यांनी सांगितले. या प्रकल्पातून कापूस, रुई, कापड आणि संत्र्यांची निर्यात सुलभ होणार असून वाहतुकीचा खर्चही कमी होईल. याठिकाणी कोल्ड स्टोरेज, वेअरहाऊस, निर्यातदारांसाठी क्लस्टर आणि कस्टम कार्यालयाची सुविधा निर्माण केली जाणार आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी, व्यापारी आणि निर्यातदारांना मोठा लाभ होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



