Published On : Sat, Jun 3rd, 2017

पर्यावरण दिनापासून करा कचऱ्याचे विलगीकरण : कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर


नागपूर: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नागपूर शहरातील नागरिकांनी ओला आणि सुका कचरा निर्मिती स्थळापासूनच विलग करावा. ओला कचरा हिरव्या डब्यात आणि सुका कचरा निळ्या डब्यात टाकावा. ओला व सुका कचरा वर्गीकृत करुन साठवणे व मनपा यंत्रणेस वर्गीकृत स्वरुपातच सुपूर्द करणे, मनपाने वर्गीकृत स्वरुपातच कचऱ्याची वाहतूक करणे व पुढील प्रक्रिया करण्यावर भर देण्यात येणार आहे.. या अभियानात नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी केले. शनिवारी (ता. 3) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, सत्तापक्षनेते संदीप जोशी, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, नगरसेवक प्रवीण भिसीकर, सुनिल हिरणवार, दिव्या धुरडे यांची उपस्थिती होती.

देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये हे अभियान सुरू होणार आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ अंतर्गत कचरा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच तो ओला व सुका असा वर्गीकृत करण्याची तरतूद असल्यामुळे हे अभियान हाती घेण्यात येत आहे. नागरिकांनी ओल्या व सुक्या स्वरुपात दिलेला वर्गीकृत कचरा पुन्हा एकत्र होणार नाही तसेच कचऱ्याची वर्गीकृत स्वरुपातच वाहतूक करण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. कचरा निर्मात्यांनी (घर, दुकान, व्यवसायाचे ठिकाण, संस्था इ.) त्यांच्याकडे निर्माण होणारा ओला कचरा हिरव्या रंगाच्या डब्यात तर सुका कचरा निळया रंगाच्या डब्यात ठेवून मनपाच्या कचरा संकलन यंत्रणेकडे सुपूर्द करावा, असे आवाहन श्री. पार्डीकर यांनी केले आहे.

शहरातील ग्रीन व्हिजील फाऊंडेशन, किंग कोब्रा ऑर्गनायझेशन, मैत्री परिवार, स्वयं असोशिएशन, सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, आय क्लिन, वृक्ष संवर्धन समिती, सृष्टी पर्यावरण मंडळ, ग्रीन ॲण्ड क्लीन फाऊंडेशन, ग्रीन अर्थ आदी संस्थांचे सुमारे २६४ स्वयंसेवक शहरामध्ये जनजागृती करीत आहेत.

Advertisement

नागपुरातील सर्व रहिवासी नागरिकांना प्रत्येक घरासाठी दोन कचरापेट्या मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. तथापि आर्थिकदृष्टया सक्षम नागरिकांनी स्वखर्चाने या कचरापेट्या विकत घेण्याचे आवाहन स्थायी समिती अद्यक्ष संदीप जाधव व सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी केले आहे. अनिवासी वापर (दुकाने, संस्था इ.) करीता जर असे वापरकर्ते स्वखर्चाने कचरापेट्या विकत घेणार नसल्यास मनपातर्फे कचरापेट्या सशुल्क पुरविण्यात येतील. ज्या आर्थिकदृष्टया कमकुवत नागरिकांना मनपाकडून मोफत कचरापेट्या हव्या असतील त्यांना त्यांची मागणी www.nmcnagpur.gov.in वर ऑनलाईन नोंदविता येईल. ज्यांना ऑनलाईन नोंदणी घरुन करणे शक्य नसेल त्यांच्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत मदत केंद्रे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यासाठी नागरिकांनी आपले नाव, पत्ता, आधार कार्ड क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, मालमत्ता क्रमांक (असल्यास तो अनिवार्य) या संपूर्ण माहितीसह क्षेत्रीय कार्यालयाची मदत घेऊन आपली मागणी ३० जूनपर्यंत नोंदवावी, असेही श्री. पार्डीकर यांनी सांगितले.

मनपातर्फे शहरातील सुमारे सहा लाख मालमत्ता धारकांना घरोघरी जाऊन एक माहिती पत्रक देण्यात येत आहे, पत्रकाच्या मागील बाजूस नागरिकांना त्यांचा अभिप्राय नमूद करण्यासाठी जागा ठेवली आहे. सर्व नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवावे असे आवाहनही श्री. दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव व सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी केले.

मनपाची कचरा संकलन एजन्सी ‘कनक रिर्सोसेस’च्या कचरा संकलन वाहनांनादेखिल ओला व सुका कचरा ठळकपणे दर्शविणारा हिरवा व निळा रंग देण्यात आला आहे. ओला कचरा दररोज व सुका कचरा काही ठिकाणी आठवड्यात एकदा व काही ठिकाणी आठवड्यातून दोनदा संकलित केला जाईल.

या संपूर्ण अभियानात, शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यास आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही मनपाच्या वतीने कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव व सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी केले आहे.

अस्वच्छता पसरविणा-यांवर होणार कठोर कारवाई

शहरात तसेच नदीमध्ये कचरा फेकणारे आणि अस्वच्छता पसरविणा-यांवर लवकरच कठोर कारवाई करण्यात येणार असून नवीन कठोर नियमांची तयारी मनपाने केली आहे, येत्या 15 दिवसांत याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Advertisement
Advertisement
Advertisement