Published On : Sat, May 1st, 2021

बेसा – बेलतरोडी परिसरातील गरजू कोरोनाग्रस्तांना मोफत जेवण,अंडी व फळ वाटप

अंडी,फळ, मास्क, स्यानीटाइझर व जेवणाचे मोफत वितरण

नागपूर. गरीब कोरोनाग्रस्त रुग्णाची होणारी परवड लक्षात घेऊन बेसा – बेलतरोडी परिसरातील कोरोनाग्रस्त नागरिकांसाठी १ ते १० मे पर्यंत मोफत जेवण, अंडी, मास्क, स्यानीटाइझर व फळ वाटप करण्यात येत आहे. या भागातील बडोले कुटुंबाने पुढाकार घेत परिसरातील गरजू नागरिकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

शहरात कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहेत. अशात कोरोनाग्रस्त गरीब कुटुंबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. घरीच विलगीकरणात असलेल्या गरीब नागरिकांना दोन वेळच्या जेवणाची देखील चिंता सतावत आहे. या संकटात कोरोनाग्रस्तांना दोन वेळच्या जेवणासह सकस आहार गरजेचा आहे. ही बाब लक्षात घेऊन बेसा – बेलतरोडी परिसरातील प्रतिष्ठित नागरिक धनराज बडोले व त्यांच्या मातोश्री मालन बडोले यांनी पुढील दहा दिवस कोरोनाग्रस्त नागरिकांसाठी सकाळी ९ ते १०:३० व संध्याकाळी ७ ते ७:३० दरम्यान अंडी,फळ,मास्क,स्यानीटाइझर व जेवणाचे टिफीन वाटप करणार आहेत. बेसा येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप समोर प्लॉट नंबर २३७ येथून सदर वाटप सुरू असून गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन धनराज बडोले यांनी केले आहे.

या जागतिक माहामारित सर्वच नागरिक संकटाचा सामना करीत आहे. मात्र यात सर्वाधिक गरीब कुटुंबांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे. त्यामुळेच आम्ही या गरजू लोकांना मदत करण्याचे ठरवून पुढील दहा दिवस अंडी,फळ,मास्कसह जेवणाचे टिफीन मोफत वाटपाचा निर्णय घेतला आहे. सर्व गरजू कोरोनाग्रस्त नागरिकांनी लाभ घ्यावा.