
नागपूर -महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय कार्याबद्दल सन २०२५ साठी जाहीर करण्यात आलेल्या पोलीस महासंचालकांच्या (DG) सन्मानचिन्हांमध्ये यंदा अनेक अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये शुभांगी देशमुख, तसेच डीसीपी निकेतन कदम आणि डीसीपी लोहित मटाणी यांचा समावेश असून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या विविध शासन निर्णयांच्या आधारे उत्कृष्ट सेवा, धाडसी कामगिरी आणि कर्तव्यदक्षतेसाठी हा सन्मान प्रदान केला जातो. यंदाच्या यादीत विविध प्रवर्गांतील अधिकारी व अंमलदारांचा समावेश असून, त्यांच्या कामगिरीची दखल घेत पोलीस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी सर्व सन्मानित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या सन्मानामुळे पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याला नवी प्रेरणा मिळणार असून, जनतेच्या सेवेसाठी अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.








