| | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, May 10th, 2017

  डोक्यात सत्तेची नशा गेल्याने दानवेंकडून बेताल वक्तव्येः खा. अशोक चव्हाण

  Ashok Chavan
  मुंबई:
  “इतकी तूर खरेदी करूनही शेतक-यांचे रडगाणे सुरुच आहे. एक लाख टन तूर खरेदीला परवानगी दिली तरी रडतात साले.” असे वक्तव्य करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळले असून, सत्तेची नशा दानवेंच्या डोक्यात गेल्याने दानवे शेतक-यांबाबत असंसदीय शब्द वापरून अशी बेताल वक्तव्ये करित आहेत. राज्यातले शेतकरी भाजप नेत्यांची सत्तेची नशा उतरवल्याशिवाय राहणार नाहीत. अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

  जालना येथे बोलताना शेतक-यांबाबत दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्यातील तूर उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. राज्यातल्या शेतक-यांची सगळी तूर खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरु राहतील अशी घोषणा सरकारने केली होती. पण त्यानंतर सरकारने तूर खेरदी केंद्र बंद करून राज्यातील शेतक-यांचा विश्वासघात केला. काँग्रेस पक्षाने याविरोधात आवाज उठवल्यानंतर तूर खरेदी सुरु करू असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पण अद्यापही अनेक ठिकाणी तूर खरेदी केंद्र सुरु झाली नाहीत. दरम्यानच्या काळात अवकाळी पावसाने तूर खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभ्या असलेल्या अनेक शेतक-यांची तूर भिजल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील तूर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्या शेतक-यांना नुकसान भरपाई देऊन त्यांची संपूर्ण तूर खरेदी करणे हे सरकारचे कर्तव्य असताना सत्ताधारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळणारी वक्तव्ये करित आहेत. शेतक-यांबाबत असंसदीय शब्दांचा वापर करित आहेत. यावरून या सरकारला शेतक-यांसंबंधी संवेदना नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

  यापूर्वीही दानवे यांनी “शेतक-यांना कर्जमाफी दिली तर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत याची लेखी हमी द्या” असे वक्तव्य केले होते. राज्यातल्या साडेनऊ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत तरी राज्य सरकार शेतक-यांना कर्जमाफी देत नाही. शेतक-यांना कर्जमाफी देऊन त्यांना संकटातून बाहेर काढण्याऐवजी सत्ताधारी भाजपचे नेते शेतक-यांबाबत बेताल वक्तव्य करित आहेत. भाजपा नेत्यांची सत्तेची नशा चढल्याने ते अशी बेताल वक्तव्ये करित आहेत. पण राज्यातले शेतकरी भाजप नेत्यांची सत्तेची नशा उतरवल्याशिवाय राहणार नाहीत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145