
नागपूर : मुलीच्या कस्टडीवरून सुरू असलेल्या वादाचा शेवट थेट हत्येत झाल्याची संतापजनक घटना नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पत्नीशी सुरू असलेल्या कस्टडी वादातून पित्यानेच आपल्या आठ वर्षांच्या मुलीची चाकूने भोसकून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
ही घटना १४ जानेवारी २०२६ रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास सरोडे नगर येथील प्लॉट क्रमांक १२ मध्ये घडली. शेखर कृष्णराव शेंद्रे (वय ४६) हा वैवाहिक वादामुळे पत्नी शुभांगीपासून वेगळा राहत होता. दोघांमधील मुलगी धनश्री शेंद्रे (वय ८) ही वडील व आजी कुसुमबाई शेंद्रे (वय ७१) यांच्यासोबत राहत होती.
पोलिस सूत्रांनुसार, आई शुभांगी शेंद्रे ही मुलीचा ताबा (कस्टडी) मिळावा यासाठी वारंवार आग्रह धरत होती. यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. बुधवारी पहाटे कस्टडीच्या मुद्द्यावर पुन्हा वाद झाला. याच वादातून संतापाच्या भरात शेखर शेंद्रे याने चाकूने धनश्रीच्या छातीत वार केल्याचा आरोप आहे.
मुलीच्या किंकाळ्या ऐकून आजी कुसुमबाई व आरोपीचा भाऊ उमेश शेंद्रे घटनास्थळी धावले. गंभीर जखमी अवस्थेत धनश्रीला तातडीने वाठोडा पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथून पोलिसांनी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी कुसुमबाई शेंद्रे यांच्या तक्रारीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गायकवाड यांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करून शेखर शेंद्रे याला अटक केली आहे. कस्टडी वादाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन पोलीस पुढील तपास करत आहेत.








