नागपूर : जुगार अड्ड्याच्या पैशावरून सुरू असलेल्या वादातून गुन्हेगारांनी प्रतिस्पर्ध्यावर जीवघेणा हल्ला केला. सदरच्या अंजुमन कॉम्प्लेक्सजवळ बुधवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी सदर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे गुन्हेगारांमध्ये टोळीयुद्ध भडकण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. सरफराज अब्दुल खान (वय 42, रा. गड्डीगोदाम) असे जखमी आरोपीचे नाव असून अनीस उर्फ अन्नू भांजा अब्दुल शफीक (वय 30, रा. टेका नाका, पाचपोली) आणि नौभान शेख बशीर अहमद शेख (20, रा. टेका नाका, सिद्धार्थनगर, पाचपोली) अशी इतर आरोपींची नावे आहेत.
सरफराज हा जुना गुन्हेगार आहे. सदरचा प्रसिद्ध बबलू अमरीशच्या हत्येत त्याचा सहभाग होता. त्याला जुगाराचे व्यसन आहे. या घटनेचा सूत्रधार अन्नू हाही गुन्हेगार आहे. तो जुगारीही आहे. दोघेही प्रसिद्ध जुगारी सलाउद्दीनशी संबंधित आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरफराजला अन्नूकडून जुगाराचे दीड लाख रुपये घ्यायचे होते. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होता.
तीन दिवसांपूर्वी कपिल नगर पोलिस ठाण्यांतर्गत टेका नाका येथे सरफराजने अन्नूला मारहाण केली. यावर अन्नू संतापला. सरफराजला मारण्यासाठी तो त्याचा शोध घेत होता. बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सरफराज त्याच्या मित्रांसोबत अंजुमन कॉम्प्लेक्सजवळील चहाच्या टपऱ्यासमोर बसला होता. त्याचवेळी अन्नू त्याच्या पाच-सहा मित्रांसह तेथे आला. त्यांनी सरफराजवर धारदार शस्त्राने वार करत हल्ला केला. त्यानंतर आरोपींची तेथून पळ काढला.
याचदरम्यान सरफराजचे इतर मित्र त्याच्या मदतीसाठी धावले. मित्रांनी गंभीर जखमी झालेल्या सरफराज रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांना सरफराजने हल्लेखोरांची माहिती देण्यास टाळाटाळ सुरू केली होती. नंतर पोलिसांना आरोपींशी त्याचा वाद सुरु असल्याचे माहित झाले. त्याआधारे पोलिसांनी अन्नू आणि त्याच्या साथीदाराला अटक करण्यात आली. या घटनेमुळे शहरात जुगाराचे अड्डे सुरू असल्याचे उघड झाले आहे. वर्षभरापूर्वीही नंदनवन येथील जगनाडे चौकात एका तरुणावर जुगार अड्ड्यावर आरोपींनी जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी सदर पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.