
चंद्रपूर – अपंग कल्याण विभागाच्या आदेशानुसार चालू असलेल्या तपासणीदरम्यान चंद्रपूर जिल्हा परिषदेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला. दिव्यांग म्हणून नोकरी घेतलेल्या काही कर्मचाऱ्यांनी आवश्यक यूडीआयडी प्रमाणपत्र सादर न केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्हा परिषदेने कठोर पाऊल उचलत १२ कर्मचाऱ्यांना सरसकट बडतर्फ केले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी ही कारवाई करताच विविध विभागांमध्ये खळबळ उडाली. विशेष म्हणजे बडतर्फ झालेल्यांमध्ये दहा शिक्षकांसह दोन कनिष्ठ अभियंतेही आहेत. तपासणीदरम्यान काही कर्मचाऱ्यांनी दिव्यांग श्रेणीसाठी आवश्यक कागदपत्रेच सादर केली नव्हती, तर काहींचे अपंगत्व ४० टक्क्यांच्या निकषापेक्षा कमी असल्याचेही आढळले.
अपंग कल्याण विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने दिव्यांग कर्मचाऱ्यांचे दस्तऐवज तपासण्याचे काम हाती घेतले होते. त्यानुसार मिळालेल्या निष्कर्षांच्या आधारे ही बडतर्फी करण्यात आली. या कारवाईनंतर बोगस प्रमाणपत्रांवर नोकरी मिळवणाऱ्यांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषदेत येत्या काही दिवसांत आणखी काही प्रकरणांवर निर्णय होण्याची शक्यता असल्याने विविध विभागांमध्ये प्रचंड तणावाचे वातावरण आहे.









