Published On : Fri, Jan 26th, 2018

विघटनवादी शक्तींना सत्तेवरून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीः अशोक चव्हाण

मुंबई: संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष आपला लढा अधिक तीव्र करणार असून विघटनवादी शक्तींना सत्तेवरून दूर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन खा. चव्हाण म्हणाले की, सत्ताधारी पक्ष सामाजिक वातावरण गढूळ करून त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करित आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर पोलिसांकडून पाळत ठेवली जात आहे. पण काँग्रेस पक्ष अशा प्रकारांना घाबरणार नाही. संविधान वाचले तरच हा देश वाचेल, त्यामुळे संविधान बदलण्याचे कारस्थान करणा-या या सरकारविरोधातील लढा आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

टिळक भवन येथे पार पडलेल्या या सोहळ्याला विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, विधानपरिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री सुरेश शेट्टी, खा. हुसेन दलवाई, आ. शरद रणपिसे, आ. भाई जगताप, आ. हुस्नबानो खलिफे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अनुसूचीत जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजू वाघमारे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. गणेश पाटील, यशवंत हाप्पे, राजन भोसले युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे, यांच्यासह पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.