Published On : Wed, Aug 23rd, 2017

हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

Heritage Meeting Photos 23 Aug (1)
नागपूर:
शहरातील कस्तुरचंद पार्कचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्याचे पुनरूत्थान व सौंदर्यींकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी नागपूर यांचकडून प्रस्ताव देखील प्राप्त झाला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने कस्तुरचंद पार्क मैदान हे स्वतंत्रता दिवस, गणतंत्र दिवस, महाराष्ट्र दिन याव्यतिरिक्त इतर हंगामी कार्यक्रमाला परवानगीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हेरिटेज समितीने घ्यावे, असे आदेश दिले आहे.

शहरातील वास्तु जतन करण्याच्या उद्देशाने गठित करण्यात आलेल्या हेरिटेज संवर्धन समितीची बैठक महानगरपालिकेच्या मुख्यालयातील आयुक्त सभागृहात नीरीचे माजी संचालक डॉ.तपन चक्रवर्ती यांच्या अध्यतेखाली घेण्यात आली. हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी अरूण पाटणकर हे वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्यामुळे समितीचे सदस्य डॉ.तपन चक्रवर्ती यांनी बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषवावे असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या बैठकीला स्ट्रक्चरल अभियंता पी.एस.पाटणकर, एल.ए.डी.च्या प्राचार्या उज्ज्वला चक्रदेव, सदस्य डॉ.शुभा जोहरी, प्रसिद्ध वास्तुविशारद अशोक मोखा, नागपूर वास्तु संग्राहलयाचे क्युरेटर डॉ.विराग सोनटक्के, नगररचना विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल, नगररचनाकार प्र.प्र. सोनारे उपस्थित होते.

बैठकीत सर्वोच्च न्यायालयात आदेशान्वये हेरिटेज संवर्धन समितीने महाराष्ट्र राजपत्रात व दैनिक वर्तमानपत्रात सूचना प्रसिद्ध करून ४९ वास्तुंबाबत नागरिकांकडून आक्षेप मागविले होते. तसेच कस्तुरचंद पार्कचे पुनरूत्थान अथवा सौंदर्यीकरणाच्या कामांना मान्यता देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

उक्तप्रमाणे प्राप्त झालेल्या एकूण १४ आक्षेपांवर निर्णय घेण्याकरिता प्राचार्य श्रीमती उज्ज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली स्ट्रक्चरल अभियंता पी.एस.पाटणकर, डॉ.शुभा जोहरी, वास्तुविशारद अशोक मोखा अशी तीन सदस्यीय उपसमिती गठीत करण्यात आली. उपसमितीने नागरिकांच्या आक्षेपांवर निर्णय घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.

कस्तुरचंद पार्कवर विविध संस्थांनी प्रदर्शनीकरिता जागा उपलब्ध करून देण्याकरिता अर्ज सादर केले होते. तसेच विजयादशमीला कस्तुरचंद पार्कवर रावण दहनासाठी परवानगी मागितली होती. परंतु हेरिटेज संवर्धन समितीने दोन्ही प्रस्ताव बैठकीत नामंजूर केले.

कस्तुरचंद पार्क सौदर्यीकरणाच्या दृष्टीने नागरिकांकरिता करण्यात येणाऱ्या सोयीसुविधा आणि राष्ट्रध्वज उभारण्याकरिता परिघीय सौंदर्यीकरण प्रकल्प संकल्पनेबाबतचे सादरीकरण स्लाईड शोच्या माध्यमातून करण्यात आले. या संदर्भात विकासात्मक निर्णय घेण्याची जबाबदारी उपसमितीकडे सोपविण्यात आली. तसेच कस्तुरचंद पार्कच्या बाहेर असलेला पुतळा आतील भागात स्थानांतरीत न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.