नागपूर : महाविकास आघाडीत अद्यापही जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. मात्र जागावाटपावर चर्चा सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी सांगलीची जागा जाहीर करणे हे अडचणीचे झाले आहे. आघाडीत एखाद्या जागेची चर्चा सुरू असताना एकतर्फी नाव जाहीर करायला नको होते.उद्धव ठाकरे यांनी उमेदवाराचे नाव जाहीर केले असून ते योग्य नाही,असे मत व्यक्त करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. ते नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.
महाविकास आघाडीच्या बैठकीत काही जागांबाबत चर्चा सुरू असून त्या चर्चेनंतर जाहीर केल्या जाणार आहेत.सांगलीच्या जागेबाबत निर्णय झालेला नसल्याचे पटोले म्हणाले. काँग्रेसचे खाते गोठवण्यावरूनही पटोले यांनी मोदी सरकारवर टीका केली.
आमच्या पक्षाचे खाते गोठवणे हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. विरोधी पक्षाकडे पैसे राहू नये. आपण मात्र बाँडच्या माध्यमातून पैसे गोळा करायचे, हा भाजपचा डाव आहे. गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्याकडून भाजपने निवडणुकीसाठी पैसे घेतले.
भाजपनेही आयकर भरला नाही. मग त्यांचे खाते का गोठवले गेले नाही, असा संताप पटोले यांनी व्यक्त केला. हिंमत असेल तर आयकर विभागाने भाजपचे खाते गोठवावे असे आव्हानही पटोले यांनी केले आहे.