Published On : Thu, Jan 3rd, 2019

शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी साधला विद्यार्थ्यांशी थेट संवाद

Advertisement

नागपूर: शंकरनगर येथील सरस्वती विद्यालयात शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी शालेय विद्यार्थ्यांशी आज थेट संवाद साधला. सरस्वती विद्यालयामध्ये नागपूरमधील हडस विद्यालय, धरमपेठ हायस्कूल, टाटा हायस्कूल, जिंदाल विद्यामंदीर, राजेंद्रनगर हायस्कूल, परांजपे हायस्कूल आदी विविध विद्यालयातील विद्यार्थी यांच्या थेट संवादात सहभागी झाले होते.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना त्यांच्या मनातील प्रश्न जाणून घेतले. सध्या सुरु असलेला अभ्यासक्रमातील तुम्हाला कोणते विषय आवडतात?. तसेच अभ्यासक्रम बदलण्याचे दृष्टीने विद्यार्थ्यांच्या काही सूचना आहेत का?, असे प्रश्न श्री. तावडे यांनी विद्यार्थ्यांना विचारले.

विद्यार्थ्यांनी श्री तावडे यांना प्रश्न विचारताना शालेय अभ्यासक्रमापासून ते विविध प्रात्यक्षिक विषयांचे प्रश्न त्यांना विचारले.

काही विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमाच्या शाळांमधून शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. १० वी व १२ वी नंतर करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात, आदी प्रकारच्या सूचना केल्या. याप्रसंगी सायबर गुलामीच्या विरोधात लढण्याचे आवाहन श्री. तावडे यांनी विद्यार्थ्यांना केले. आठवड्यातून एका दिवसाची संध्याकाळ नो इलेक्ट्रीक गॅझेट डे पाळूया असे आवाहन, श्री. तावडे यांनी केले. विद्यार्थ्यांनीही शिक्षणमंत्र्यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन नो इलेट्रीक गॅझेटचा संकल्प राबविण्यास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.