Published On : Mon, Sep 26th, 2022

अशोकचक्राच्या धर्तीवर दीक्षाभूमीचा स्तूप

Advertisement

– वातावणाचा परिणाम होणार नाही अशा टाईल्स स्तुपावर,140 फूट उंच आणि 118 फूट व्यास

नागपूर – अशोकचक्राच्या धर्तीवरच दीक्षाभूमी येथील स्तुपाचे बांधकाम करण्यात आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशावर कमळपुष्पांचा वर्षाव होत असावा, अशी संकल्पना आणि रचना दीक्षाभूमी येथील स्तुपाची आहे. 140 फूट उंच आणि 118 फूट व्यास असलेला स्तूप आकाशातून पाहिल्यास अशोकचक्राप्रमाणेच दिसतो. पुढील 50 वर्षे वातावरणाचा कुठलाही परिणाम होणार नाही, अशा विशिष्ट प्रकारच्या टाईल्स स्तुपावर लावण्याचे काम सुरू आहे. या स्तुपाचे बांधकाम धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत पूर्ण होईल, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पृष्ठभूमीवर प्रशासन आणि स्मारक समिती सज्ज झाली आहे. त्याअनुषंगाने स्तूप पुन्हा चर्चेत आला आहे. 1973 ला स्तुपाचे बांधकाम सुरू होऊन 25 वर्षांनी म्हणजे 1999 ला बांधकाम पूर्ण झाले. तेव्हापासून डागडुजी झाली नव्हती. 2016 मध्ये प्रथमच निविदा काढण्यात आली. मात्र, दोन वर्षांत एकही कंत्राटदार पुढे आला नाही. त्यामुळे 2019 मध्ये पुन्हा निविदा काढण्यात आली. एक कंत्राटदार पुढे आला. मात्र, स्तुपाची उंची आणि व्यास तसेच स्तुपाच्या मूळ संकल्पनेला धक्का न लावता डागडुजी करणे म्हणजे समुद्रातून सुई शोधून आणण्यासारखे आहे. त्यामुळे अजूनही ते काम पूर्ण झालेले नाही.

अशोकचक्रात चोवीस आरे असतात, त्याचप्रमाणे दीक्षाभूमीच्या स्तुपाला 24 आरे असून 24 पिल्लरवर उभा आहे. 24 खिडक्या आहेत. 24 कमळपुष्प असून प्रत्येक पुष्प 12 बाय 12 चे आहे. स्तुपाच्या आत असलेल्या बाबासाहेबांच्या अस्थिकलशावर कमळपुष्पांचा वर्षाव होत असावा अशी ती संकल्पना आहे.

उपासक, उपासिका, समाजबांधव, पर्यटक, संशोधक, इतिहासकार आणि रस्त्याने ये-जा करणार्यांच्या मनात स्तुपाकडे पाहून अनेक प्रश्न उपस्थित होत असावेत. स्तुपाच्या सभोवताल लोखंडी सेंट्रिंग आहे. स्तुपाला धरून नेमके काय सुरू आहे? एवढी वर्षे कामाला लागतात काय? कधी होईल काम पूर्ण? अशी कुजबुज आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत काम पूर्ण
धम्मचक्र प्रवर्तन दिनापर्यंत स्तुपाचे काम पूर्ण होईल. मात्र लोखंडी सेंट्रिंग काढणे जिकरीचे काम आहे. त्यासाठी पुन्हा काही महिने लागतील. 14 एप्रिल 2023 पर्यंत हे काम पूर्ण झालेले असेल. कंत्राटदार मिळत नसल्याने कामाला उशीर झाला. सात कोटींच्या अवाढव्य खर्चाने एनआयटीच्या माध्यमातून काम पूर्णत्वात येत आहे, अशी माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी दिली.