Published On : Fri, Oct 8th, 2021

दिघोरीत दंत तपासणी शिबीर

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने नगरसेवक विजय (पिंटू) झलके यांच्या दिघोरी येथील जनसंपर्क कार्यालयात दंत तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवारी (ता.७) करण्यात आले होते. परिसरातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

दंत तपासणी शिबिराचे उद्घाटन उपमहापौर मनीषा धावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आरोग्य सभापती संजय महाजन, मनपाचे माजी स्थायी समिती सभापती तथा नगरसेवक विजय झलके, सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकरे, मनपाचे सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी उपस्थित होते.

महापौरांच्या संकल्पनेने व पुढाकाराने ‘आझादी -७५’ अंतर्गत संपूर्ण शहरामध्ये ७५ दंत तपासणी शिबिर घेण्यात येणार आहेत. शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी नागपूर महानगरपालिका आरोग्य यंत्रणा बळकट करीत आहे. सोबतच आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना प्रत्येक आरोग्य सोयीचा लाभ मिळावा यासाठी शहरातील विविध भागात शिबीर आयोजित करण्यात येत आहे. महापौर नेत्र ज्योती योजना, महापौर दृष्टी सुधार योजना आदींच्या माध्यमातून गरजूंना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ देण्यात येत आहे. याअंतर्ग सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांची दंत तपासणी डॉक्टरांच्या चमूने केली. तपासणीनंतर आवश्यकता असणा-या व्यक्तींच्या दातांची सफाई, फिलिंग सुद्धा दंत महाविद्यालयाच्या चमूद्वारे करण्यात आली. तपासणीमध्ये मुख कर्करोगाचा धोका असलेल्यांना आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले.

शिबिरामध्ये दातांची स्वच्छता, दातांमध्ये फिलिंग करणे, दात काढणे, कॅन्सरच्या धोक्याबाबत तपासणीद्वारे योग्य माहिती देण्यात आली. याशिवाय एक दिवसापेक्षा जास्त कालावधीच्या उपचाराबाबतही शिबिरामध्ये तपासणी आली. पुढील उपचार शासकीय दरात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयामध्ये करण्यात येतील. यासाठी तेथे शिबिराच्या माध्यमातून येणा-या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष व वेगळी व्यवस्था सुद्धा करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी यांनी दिली.