Published On : Sat, Dec 29th, 2018

समस्या सोडविण्यासाठीच नागरिकांशी संवाद : महापौर नंदा जिचकार

Advertisement

महापौर आपल्या दारी : गांधीबाग झोनमधील समस्यांचा घेतला आढावा

नागपूर : शहरातील नागरिकांना रोजच मुलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. पाणी, गडर लाईन, अतिक्रमण, सिवर लाईन, कचरा तसेच इतर सुविधा प्रदान करण्यासाठी नागपूर महानगरपालिका सदैव कटिबद्ध आहे. दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या मुलभूत सुविधांबाबतच्या समस्या तातडीने सोडविता याव्यात यासाठीच नागरिकांशी संवाद साधून त्यावर कार्यवाही करण्यात येत आहे, असे महापौर नंदा जिचकार यांनी नागरिकांसोबत चर्चा करताना सांगितले.

‘महापौर आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत शनिवारी (ता. २९) महापौर नंदा जिचकार यांनी गांधीबाग झोनमधील प्रभाग क्रमांक १९ आणि २२ येथील समस्यांचा आढावा घेतला. यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, गांधीबाग झोन सभापती वंदना यंगटवार, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, राजेश घोडपागे, नगरसेविका सरला नायक, श्रद्धा पाठक, उपायुक्त राजेश मोहिते, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, सहायक आयुक्त अशोक पाटील, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महापौर नंदा जिचकार यांनी गांधीबाग झोनमधील बजेरीया प्लॅटफॉर्म शाळा, मच्छी बाजार, टाटा पारसी शाळा, क्वेटा कॉलनी, देवाडिया रुग्णालय, कोलबास्वामी चौक, फवारा चौक, जुनी मंगळवारी आदी ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी बजेरिया येथील प्लॅटफॉर्म शाळेमध्ये नागरिकांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण केले. झोनमधील पोद्दारेश्वर राम मंदिराजवळील पुलाखाली खोदकाम करण्यात आले असून अनेक दिवसांपासून मलबा तिथेच पडून असल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. यासंदर्भातही त्यांनी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी महापौरांनी मच्छी बाजाराची पाहणी करून परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. मच्छी बाजारातील विक्रेत्यांना व्‍यवसायासाठी स्थायी स्वरूपाची जागा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

स्मार्ट सिटी अंतर्गत या बाजारासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करण्यात येईल, महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले. परिसरात असलेल्या वाईन शॉपमुळे येथे असामाजिक तत्वांचा वावर असतो. रस्त्यावर नागरिकांच्या गाड्यांची गर्दी असते त्यामुळे ये-जा करण्यास त्रास होतोच शिवाय महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होत आहे. या परिसरातील वाईन शॉप हटविण्याची मागणी येथील महिलांनी केली. संबंधित दुकानाची नियमानुसार चौकशी करून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात येणार असल्याचे महापौरांनी यावेळी आश्वासित केले.

‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत प्रत्येक झोनमध्ये कचरा ‘ट्रान्सफर स्टेशन’ निर्माण करण्यात येणार आहे. संपूर्ण झोनमधून संकलित करण्यात आलेला कचरा मोठ्या गाड्यांमध्ये एकत्रित करण्यात येणार असून येथून या गाड्या प्रक्रियेसाठी पुढे जाणार आहेत. यासाठी प्रत्येक झोनमध्ये जागा निर्धारित करून कचरा ‘ट्रान्सफर स्टेशन’ निर्माण करण्यात येणार आहे. गांधीबाग झोनमध्ये जागेची कमतरता असल्याने या ठिकाणी रामझुला रेल्वे उड्डाण पुलाखाली रेल्वेची जागा आहे. या जागेची महापौर नंदा जिचकार यांनी पाहणी केली. या ठिकाणी ‘ट्रान्सफर स्टेशन’ निर्माण करण्यासाठी रेल्वेची परवानगी घेऊन येथील कामाबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

गांधीसागर तलावापुढे असलेल्या टाटा पारसी शाळेमध्ये भेट देऊन महापौर नंदा जिचकार यांनी येथील शिक्षिका तसेच विद्यार्थिनींच्या समस्या जाणून घेतल्या. शाळेच्या पुढे विविध विक्रेत्यांची अतिक्रमण करण्यात आलेली दुकाने आहेत. याशिवाय या परिसरात नेहमीच असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. या परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने योग्य कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

लकडगंज येथील क्वेटा कॉलनी परिसरात एलएडी पथदिवे लावणे व परिसरात सौंदर्यीकरण करण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले. याशिवाय परिसरात रस्त्यांवरच गाड्यांचे गॅरेज असल्याने रस्त्यावर उभ्या करून ठेवलेल्या गाड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. या गाड्या तातडीने हटवून रस्त्यावर गाड्या ठेवणाऱ्यांवर कारवाई करा, असेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले. क्वेटा कॉलनीमध्ये देवाडिया रूग्णालय बंद पडलेले आहे. या इमारतीच्या जागेवर नवीन रूग्णालय तयार करण्यात येणार आहे. यासंबंधी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची माहिती वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी यावेळी दिली. संबंधित कामाबाबतच्या उर्वरित सर्व परवानग्या घेउन काम लवकरात लवकर सुरू करण्याचे महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.

कोलबास्वामी चौकामध्ये करण्यात आलेल्या अतिक्रमणाचा महापौरांनी आढावा घेऊन अतिक्रमण करण्यात आलेल्या बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देशित केले. फवारा चौकाच्या सौंदर्यीकरणाची मागणी यावेळी नागरिकांनी केली. या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असल्याने चौकाची जागा कमी करून वाहतुकीस अडथळा न निर्माण करता चौकात सौंदर्यीकरण करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

जुनी मंगळवारी ज्ञानेश्वर मंदिर येथील मिशन शाळा बंदावस्थेमध्ये आहे. शाळेच्या जागेमध्ये ई-लायब्ररी व क्रीडा संकुल निर्माण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली. यासंबंधी ७ जानेवारी २०१९ ला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ‘जनसंवाद’ कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामध्ये संबंधित विषयाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. याशिवाय शाळेच्या मागील बाजूला असलेला कचरा टब बंद करण्याचेही त्यांनी निर्देशित केले.