
दिवाळीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारीसावंगा गावात पोहोचणार आहेत. एका शेतकरी कुटुंबाच्या घरी ते रात्रीचा मुक्काम करणार असून, दुसऱ्या दिवशी त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी गावात तयारी सुरू झाली आहे. मात्र या भेटीचे महत्त्व केवळ मुख्यमंत्र्यांचा मुक्काम एवढेच नाही, तर राज्याचा प्रमुख थेट शेतकऱ्याच्या घरात जाऊन त्याचे दुःख आणि अडचणी समजून घेणार आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे.
यंदा पावसाअभावी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अशा परिस्थितीत दिवाळी साजरी करायची तरी कशी, असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर आहे. सरकारकडून पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्यात आली असली, तरी शेतकऱ्यांच्या अडचणी संपलेल्या नाहीत. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सण साजरा करण्याचा घेतलेला निर्णय चर्चेचा विषय ठरत आहे.
विशेष म्हणजे, प्रत्येक मंत्र्याने किमान एक दिवस एखाद्या गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करावी, असे आवाहनही फडणवीस यांनी केले होते. शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, अशी त्यांची भूमिका होती. आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी या आवाहनाची सुरुवात कृतीतून केली आहे.
दिवाळीच्या दिव्यांनी उजळणाऱ्या शहरांपासून दूर, दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या एका शेतकरी कुटुंबाच्या घरात यंदा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिवाळीचा दिवा उजळणार आहे. शेतकऱ्याच्या ताटातील अन्न, घरातील परिस्थिती आणि मनातील वेदना समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री त्यांच्याच घरात मुक्काम करणार आहेत. या भेटीतून शेतकऱ्यांना केवळ भावनिक आधार मिळतो की त्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णयही होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




