नागपूर : राज्यातील महत्त्वपूर्ण मतदारसंघापैकी एक असलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली.
आतापर्यंत हाती आलेल्या प्राथमिक कलानुसार दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. फडणवीस हे ४७१३ मतांनी आघाडीवर असून काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधे पाटील २४६७ मतांनी पिछाडीवर आहेत.
नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात २०१९ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा तीन टक्क्यांची वाढ झालेली आहे. दक्षिण-पश्चिममध्ये भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विजयाचा चौकार मारण्यासाठी लढले तर काँग्रेसकडून प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी परिवर्तनाचा नारा देत जोरदार प्रचार केला.
यंदा दक्षिण-पश्चिममध्ये ५४.५९ टक्के मतदान झाले आहे, जे २०१९ मधील ५१ टक्क्यांपेक्षा तीन टक्क्यांनी अधिक आहे. मतदानातील ही किंचित वाढ निकालात मोठा फरक पाडू शकेल काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.