Published On : Fri, Mar 17th, 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार ‘या’ ब्रँडचं मॉडेलिंग


मुंबई:
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात येण्यापूर्वी मॉडेलिंग केल्याचं तुम्हाला माहिती असेलच. पण आता मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मॉडेलिंग करायचं आहे. आश्चर्य वाटतयं ना?… पण हे खरं आहे आणि स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मॉडेलिंग करायचं आहे हे नक्की आहे पण हे कुठल्याही बँडच्या जाहिरातीसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी करायचं आहे. म्हणजेच मुख्यमंत्र्यांना स्वत:चा असा ‘ब्रँड महाराष्ट्र’ तयार करायचा आहे. ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह २०१७’ मध्ये मुख्यमंत्र्यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’ या कार्यक्रमात रॅपिड फायर राउंडमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मॉडेलिंगसंदर्भात प्रश्न विचारला की, मॉडेलिंग करायचं तर कुठल्या ब्रँडचं कराल? यावर उत्तर देताना फडणवीस यांनी म्हटलं ‘ब्रँड महाराष्ट्र’.

मुख्यमंत्री म्हणून राज्याच्या संपूर्ण विकासाचा आणि संपूर्ण राज्याच्या परिवर्तनाचा अजेंडा समोर आहे. या अजेंड्यानुसार, येत्या दोन ते तीन वर्षांत राज्यामध्ये संपूर्ण परिवर्तन झाल्याचे दिसून येईल, असा विश्वास व्यक्त करून राज्याचा स्वतःचा असा ‘ब्रँड महाराष्ट्र’ तयार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


नवी मुंबई विमानतळाचा प्रश्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एका व्हीडिओ कॉन्फरन्सिंगनंतर सुटला. तसेच मुंबईच्या शहराच्या विकास आराखड्यातील पर्यावरणाचा महत्त्वाचा मुद्दाही आम्ही केंद्राकडे मांडला असून त्यावरही निर्णय झाला आहे. वस्तू व सेवा कराची (जीएसटी) सुरूवात जुलैपासून होणार आहे. या कराबाबत जीएसटी परिषदेत साधकबाधक चर्चा झाली असून त्याला सर्वांचा पाठिंबा आहे. या करामध्ये लहान राज्यांबरोबरच मोठ्या राज्यांनाही फायदा होणार आहे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.