कन्हान: भारत देशातील बहुतांश लोकसंख्या ही ग्रामीण भागातील गावातच (खेड्यात) आहे. आज जर या देशाचा विकास करायचा असेल तर सर्वप्रथम ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंब आत्मनिर्भर व विकसित होणे आवश्यक आहे. असे मनोगत ग्रामीण उन्नत भारत प्रकल्पाचे समन्वयक डॉ. अनिल वाघ यांनी उन्नत भारत प्रकल्प अंतर्गत आयोजित कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात व्यक्त केले.
श्री साई सेवा शिक्षण मंडळ द्वारा सालवा येथील श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्ट्स येथे उन्नत भारत प्रकल्प अंतर्गत स्वंयरोजगार निर्मिती बद्दल परिसरातील स्थानिक महिलांना माहिती देण्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत उपस्थित महिलांना देशी गाईच्या पंचगव्यापासून विविध उपयोगी वस्तू जसे – फिनाइल, फेस पैक, धूप बत्ती, साबण इ. उपयोगी वस्तू बनवण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.
ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगार प्राप्त होऊन उद्योगाच्या माध्यामातून त्यांचे कुटुंब स्वंयपूर्ण व्हावे व त्यामाध्यमातून ग्रामीण भागाचा विकास व्हावा या उद्देशाने भारताचे “परम “या सुपर संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांच्या प्रेरणेतून उन्नत भारत अभियान या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. या तीन दिवस चाललेल्या कार्यशाळेस प्रा. निलेश वाघ व प्रणिती वाघ यांनी मार्गदर्शन केले.
या समारोपीय कार्यक्रमास अध्यक्षस्थानी श्री साई सेवा शिक्षण मंडळ चे सचिव विजयराव कठाळकर, प्रमुख अतिथी म्हणून येसंबा ग्राम पंचायत च्या माजी सरपंचा वनिताताई चकोले , विद्यमान उपसरपंच रवी बांगडे, ग्रामीण विकास विद्यालय सालवा चे मुख्यध्यापक राजेश मोटघरे आणि मार्गदर्शक म्हणून डॉ अनिल वाघ उपस्थित होते.
समारोपीय कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लक्ष्मिकांत बांते यांनी केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रामेश्वर नागपुरे, नितीन कारेमोरे, डीमलाल महल्ले, खुशाल शेंडे व तसेच इतर कर्मचारीवर्ग यांनी परिश्रम घेतले.
