Published On : Wed, Sep 11th, 2019

नागरिकांच्या सहकार्यानेच हुडकेश्वर – नरसाळा या क्षेत्राचा विकास – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

हुडकेश्वर – नरसाळा पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ

नागपूर : नागरिकांच्या सहकार्यानेच व स्थानिक नगरसेवकांच्या पुढाकाराने हुडकेश्वर व नरसाळा क्षेत्राचा विकास झाला आहे. भविष्यातही या क्षेत्राचा विकास हा झपाट्याने होईल, असा राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

नागपूर महानगरपालिका जलप्रदाय विभागाद्वारे हुडकेश्वर नरसाळा पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण मंगळवारी (ता. १०) चंद्रभागानगर येथील पाणी टाकीजवळ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, जलप्रदाय समिती सभापती पिंटू झलके, उपसभापती भगवान मेंढे, नगरसेविका स्वाती आखतकर, लिला हाथीबेड, विद्या मडावी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय विभाग) श्वेता बॅनर्जी, एनएमआरडीएचे अजय बोढारे, शुभांगी गायधने, डॉ.प्रिती मानमोडे, कार्यकारी अभियंता अविनाश बाराहाते, मनोज गणवीर प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना ना. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मी १५ वर्षापूर्वी या क्षेत्राचा आमदार म्हणून निवडून आलो. त्यावेळी हे क्षेत्र ग्रामपंचायत क्षेत्रात येत होते. या क्षेत्राच्या विकासासाठी आपण स्वत: पुढाकार घेतला. हे क्षेत्र नगरपालिका म्हणून घोषित करावे नाहीतर या क्षेत्राला नागपूर महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात यावे, यासाठी आपण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. युतीचे सरकार आल्यानंतर या क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणल्या. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा होता. या भागातील नागरिकांना टॅंकरवर अवलंबून राहावे लागत असे. ८५ कोटीची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या क्षेत्राचा विकास करताना या क्षेत्रात ४० हजार इलेट्रिक पोल्स लावण्यात आले. या क्षेत्रातील नगरसेवकांनी तेवढाच पुढाकार घेत या ठिकाणी विविध विकास कामे सुरू केले. महापालिका स्थायी समितीकडून या क्षेत्राच्या देखभाल दुरूस्तीसाठी आठ कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता पाणी पुरवठा योजना आल्यानंतर सर्व नागरिकांनी नळजोडणी तातडीने करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. या ठिकाणचे ९० टक्के ले – आऊट अधिकृत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

या सर्व क्षेत्रासाठी २५० कोटी रूपयांचा निधी गडरलाईनसाठी मंजूर करण्यात आला असून त्याबद्दल लवकरात लवकर प्रशासकीय प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी बोलताना दिले. या क्षेत्रात ट्रंकलाईन व गडरलाईनचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आश्वासन पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. या भागातील अंतर्गत रस्ते व पायाभूत सुविधा यासाठी ३० कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला असून त्याबद्दलची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल, असेही बावनकुळे यावेळी बोलताना म्हणाले. या क्षेत्राचा विकास हा प्राधान्याने करू. शक्य असेल तेवढ्या गतीने या ठिकाणचा विकास करू. पण वेळ लागतोच. आतापर्यंत जे सहाकार्य जनतेने केले, ते सहाकार्य या पुढेही करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

चंद्रभागानगर, संभाजी नगर, भारतमाता नगर येथील पाण्याच्या टाकी निर्मितीमुळे व पाणी पुरवठा योजनेमुळे येथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडविण्यात मदत होईल. तोतलाडोह येथील धरणातून १८०० कोटी रूपयांचे टनेल टाकून या तिन्ही टाक्यांना जोडण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय कन्हान नदीमध्ये जॅकवेल टाकण्यासाठी ४० कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या सर्व कामांना लवकरच सुरूवात होईल, असेही ते म्हणाले. यामुळे सर्व शहरातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न कायमाचा मिटेल, असेही ते म्हणाले. या सर्व क्षेत्राचा नवा विकसित आराखडा लवकरच येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

प्रारंभी मान्यवरांनी पाणी पुरवठा योजनेचा विधिवत शुभारंभ केला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत जलप्रदाय समिती पिंटू झलके यांनी केले. कार्यक्रमामागील पार्श्वभूमी पिंटू झलके यांनी प्रास्ताविकाद्वारे दिली. कार्यक्रमाचे संचालन उपसभापती भगवान मेंढे यांनी केले. कार्यक्रामाला स्थानिक नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.