नागपूर : उपमुख्यमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांना संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. अंबाझरी उद्यान, डॉ. आंबेडकर स्मारकाचा विकास करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे फडणवीस म्हणाले.
अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्याप्रकरणी नागपूर विभागीय आयुक्तांच्या अहवालाचा आधार घेत राज्य सरकारने गरुडा ॲम्युझमेंट पार्क प्रा.लि. करीत असलेल्या उद्यान विकास, संचालन आणि देखभाल दुरुस्तीच्या कामाला स्थगिती दिली आहे. दरम्यान, प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या डॉ. आंबेडकर स्मारक बचाव कृती समितीने स्मारकाची जमीन महापालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय मागे घेतला जात नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला होता.
गेल्या 157 दिवसांपासून यासाठी आंदोलन करणाऱ्या लोकांनी सोमवारी व्हरायटी स्क्वेअर ते संवधान स्क्वेअर अशी रॅली काढली आहे. किशोर गजभिये, धनराज डहाट, बाळू घरडे, सुधीर वासे आदींच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन उद्यानातील खासगी ऑपरेटर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत सुरू असलेल्या कामांना स्थगिती देण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.
गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आणि त्यांच्या इच्छेनुसार पावले उचलू, असे सांगून फडणवीस यांनी त्यांना आंदोलन संपविण्याचे आवाहन केले. “या प्रकल्पावर यापुढे खाजगी ऑपरेटर राहणार नाही. उद्यानात जी काही कामे नियोजित असतील ती शासन राबवेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने आकर्षक व भव्य सभागृह बांधण्यात येणार आहे. सरकार जमिनीची मालकी कायम ठेवेल, असे आश्वासन फडणवीस यांनी आंदोलनकर्त्यांना केले. यावेळी पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरेही उपस्थित होते आणि त्यांनी लवकरात लवकर उद्यान जनतेसाठी खुले करावे, अशी मागणी फडणवीस यांच्याकडे केली.
आम आदमी पार्टीचे संघटन सचिव प्रताप गोस्वामी म्हणाले, महापालिकेने अंबाझरी जमीन एमटीडीसीला देऊन घटनेचे उल्लंघन केले आहे. कलम 243W सार्वजनिक उद्याने चालवण्याची आणि देखरेख करण्याची जबाबदारी नगरपालिकांना देते. अंबाझरी उद्यान हे एक चांगले विकसित आणि दर्जा-1 हेरिटेज साइट आहे. ग्रेड-1 हेरिटेज साइटमध्ये कोणतेही बदल करता येणार नाहीत. केवळ देखभाल आणि जतन करण्याच्या कामांना परवानगी आहे. त्यामुळे या उद्यानाचे पर्यटनस्थळात रूपांतर करता येणार नाही.