
नागपूर-:नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्याची ओळख भविष्यात ‘ग्रीन स्टील हब ऑफ इंडिया’ म्हणून निर्माण केली जाईल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गडचिरोलीमध्ये संपूर्ण स्टील इकोसिस्टीम उभारून जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक दरात स्टील उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ परिसरात आयोजित ‘अॅडव्हांटेज विदर्भ 2026 – खासदार औद्योगिक महोत्सव’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट (AID) यांच्या पुढाकारातून आयोजित या महोत्सवात विदर्भाच्या औद्योगिक भवितव्याचा व्यापक आराखडा मांडण्यात आला.
राज्यात विविध औद्योगिक ‘मॅग्नेट हब’ विकसित करून त्या आसपासच्या जिल्ह्यांचा समतोल विकास साधण्याचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. नागपूरमध्ये महिंद्रा अँड महिंद्राकडून उभारण्यात येणाऱ्या एकात्मिक ऑटोमोबाईल प्रकल्पाचे त्यांनी विशेष कौतुक केले. २०२८ पासून सुरू होणाऱ्या या प्रकल्पातून सुमारे १५ हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. यासोबतच नागपूरमध्ये देशातील सर्वात मोठी सोलर मॉड्यूल इकोसिस्टीम आकार घेत असून, त्यातून सुमारे एक लाख रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.
अमरावतीतील यशस्वी इंटिग्रेटेड टेक्स्टाईल पार्कच्या धर्तीवर पीएम मित्रा योजनेअंतर्गत दुसरा पार्क उभारण्यात येणार असून, अमरावती विमानतळाजवळ एव्हिएशन स्कूल सुरू करण्याची योजनाही त्यांनी जाहीर केली. याचा लाभ यवतमाळ, बुलढाणा, वाशीम आणि अकोला जिल्ह्यांना होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यातील जीसीसी (Global Capability Centers) लाट लक्षात घेता औद्योगिक धोरण अधिक महत्त्वाचे ठरणार असल्याचेही ते म्हणाले. नळगंगा प्रकल्प, जलनियोजन, अन्नप्रक्रिया उद्योग आणि गॅस आधारित उद्योगांवरही त्यांनी सविस्तर भाष्य केले.
राज्याचे उद्योग सचिव पी. अन्बलगन यांनी आगामी तीन औद्योगिक क्लस्टरची माहिती देत २०४७ पर्यंत विदर्भ देशाच्या विकासात निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला.
प्रास्ताविकात AID चे अध्यक्ष आशिष काळे यांनी मागील दोन खासदार औद्योगिक महोत्सवांमधील प्रगतीचा आढावा घेतला.
एआयडीच्या पुढाकारातून जीसीसी आणि बांबू उद्योगविषयक प्रस्ताव औद्योगिक धोरणात समाविष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शंभर एकरांवर उभारण्यात येणारी ग्लोबल स्किल युनिव्हर्सिटी प्रगतीपथावर असून मनपा, AID आणि टाटा स्ट्राईड यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कौशल्यविकास उपक्रम राबवले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. यंदाचा ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ अधिक व्यापक स्वरूपाचा असून ३७० स्टॉल्स, तीन दिवसांचे बिझनेस सेशन्स, भव्य एक्सपो आणि सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अदानी समूहाचे संचालक जित अदानी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पातील दूरदृष्टीपूर्ण धोरणांमुळे भारत २०४७ पर्यंत जगातील आघाडीची अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा काशीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन निर्भय संचेती यांनी केले.
विदर्भात कुशल मनुष्यबळ उभारणी गरजेची – केंद्रीय मंत्री गडकरी
विदर्भात मोठ्या प्रमाणावर उद्योग येत असताना, त्यांना आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करणे अत्यावश्यक असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. उद्योगवाढीमुळेच विदर्भाचा सर्वांगीण विकास आणि गरिबी निर्मूलन शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक जिल्ह्याची बलस्थाने ओळखून निर्यातक्षम उद्योग विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. गडचिरोलीतील उच्च दर्जाच्या लोहखनिजाचा उल्लेख करत, हा जिल्हा जागतिक स्तरावर स्टील हब होऊ शकतो, असे ते म्हणाले. पर्यटनविषयक शिफारसी औद्योगिक धोरणात समाविष्ट केल्याबद्दल त्यांनी AID चे कौतुक केले.
पहिल्याच दिवशी चार सामंजस्य करार-
औद्योगिक महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी चार महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. सुपरस्मेलटर्स लिमिटेडकडून पोलाद उद्योगात १० हजार कोटींची गुंतवणूक होणार असून त्याचा लाभ गडचिरोली, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांना होईल. महिंद्रा अँड महिंद्राकडून पुढील दहा वर्षांत १५ हजार कोटींची गुंतवणूक करून नागपूरमध्ये ऑटोमोबाईल, ई-व्हेईकल आणि ट्रॅक्टरसाठी एकात्मिक हब उभारण्यात येणार आहे. याचा विस्तार नाशिक व संभाजीनगर येथेही केला जाणार आहे. याशिवाय एन-मोटिव इंडिया, जीआयबीसी आणि AID यांच्यातही करार झाले.
मान्यवर व गुंतवणूकदारांचा सत्कार-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पद्मश्री सत्यनारायण नुवाल व त्यांच्या पत्नींचा सत्कार करण्यात आला. तसेच विदर्भात गुंतवणूक करणाऱ्या प्रमुख उद्योगसमूहांच्या प्रतिनिधींचाही गौरव करण्यात आला.
उद्घाटन सोहळ्याला राज्य व केंद्र सरकारचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी, उद्योगजगतातील नामवंत व्यक्ती तसेच AID चे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.








