Published On : Mon, May 29th, 2023

कोराडीतील प्रस्तावित वीज प्रकल्पाला विरोध तरी मोठ्या पोलीस बंदोबस्तात जनसुनावणी सुरु!

नागपूर : कोराडीतील प्रस्तावित १,३२० मेगावॅटच्या वीज प्रकल्पाला राजकीय नेते , पर्यावरण वादी आणि स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही आज प्रकल्प परिसरातच जनसुनावणी सुरू झाली आहे.

नागपूर हवामान संकटाच्या सदस्यांनी मंच परिसरात प्रकल्पाला विरोध केल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. महानिर्मितीच्या कोराडी येथे ६६० मेगावॅटचे २ नवीन संच लावण्याचे प्रस्तावित आहे. त्याला प्रदूषणाच्या कारणावरून प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले व याच पक्षाचे स्थानिक आमदार विकास ठाकरे यांच्यासह स्थानिक नागरिकांनीही विरोध केला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यासंदर्भात उपमुख्यमंत्री व उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून हा प्रकल्प कोराडीत न करता पारशिवनीत स्थानांतरित करण्याची मागणी केली होती. मात्र या प्रकल्पाला इतका विरोध असतानाही ही सुनावणी कोराडी प्रकल्प परिसरात सोमवारी भर दुपारी सुरू झाली.

Advertisement

जनसुनावणी सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी कोराडी नागपूर हवामान संकटाचे सदस्य प्रकल्पाला विरोध असल्याचे सांगत मंच परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांचा पोलिसांसोबत मोठा वाद झाला. त्यानंतर जनसुनावणी होत असलेल्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनसुनावणी होत असून नागरिकांनी याठिकाणी मोठी गर्दी केली आहे. यावेळी परिसरात आमदार विकास ठाकरे यांच्यासह लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

Advertisement
Advertisement
Advertisement