मुंबई : सतत वादांमध्ये अडकलेल्या मंत्री मानिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा झटका दिला आहे. त्यांच्या हातून कृषी मंत्रालय काढून घेण्यात आलं असून, त्यांच्याकडे आता खेळ आणि युवक कल्याण विभाग सोपवण्यात आला आहे. दुसरीकडे, आतापर्यंत खेळ खाते सांभाळणारे दत्तात्रेय भरणे हे राज्याचे नवे कृषी मंत्री असतील.
राज्यातील सत्तास्थापनेनंतर कोकाटे सतत त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि आक्रमक वागणुकीमुळे चर्चेत राहिले. कधी शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणे, तर कधी पिक विमा योजनेविषयी सरकारला “भिकारी” म्हणणं, यासारख्या विधाने त्यांनी वारंवार केली. नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात तर ते रमी खेळताना कॅमेऱ्यात कैद झाले, ज्यामुळे सरकारवर जनतेसमोर मोठी नामुष्की ओढवली होती.
या घटनेनंतर विरोधकांनी फक्त कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही, तर अशा मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर आणि उपमुख्यमंत्र्यांवरही जोरदार टीका केली होती.
सरकारची प्रतिमा मलीन करणाऱ्या कोकाटेंच्या वागणुकीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली होती. अजित पवार यांनी यावर कठोर कारवाईचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर अखेर कोकाटेंना कृषी विभागातून हटवून त्यांच्याकडे खेळ विभाग सोपवण्यात आला.नव्या बदलांनुसार, दत्तात्रेय भरणे हे आता राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.