नागपूर: आज दिनांक ०१ फेब्रुवारी, २०२२ रोजी विद्यापीठ शिक्षण मंचच्या अध्यक्षा डॉ. कल्पनाताई पांडे, व महामंत्री डॉ. सतीश चाफले यांच्या नेतृत्वात विद्यापीठातील प्राध्यापकांच्या CAS संदर्भातील अनेक समस्या जाणून घेवून त्या संदर्भात तात्काळ मार्ग काढण्यासाठी मा. कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी व मा. प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांना निवेदन देण्यात आले.
२०१६ पासून विद्यापीठातील प्राध्यापकांच्या CAS संदर्भातील समस्या प्रलंबित होत्या. संलग्नित महाविद्यालयातील प्राध्याकापेक्षा विद्यापीठात कार्यरत प्राध्यापकांना वेगळे निकष लागतात त्यामुळे अनेक प्राध्यापक बढतीपासून वंचित आहेत. म्हणून या समस्यांना घेवून तोडगा निघावा यासाठी विद्यापीय शिक्षण मंचने आज विद्यापीठातील प्राध्यापकांची बैठक घेवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व तात्काळ मा. प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांना निवेदन देण्यात आले. खालील विषयांना धरून हे निवेदन होते.
विद्यापीठातील शिक्षकांच्या आश्वासित प्रगतीयोजना (CAS) अंतर्गत आलेल्या अर्जांचे छाननी करण्याची प्रक्रिया सुरु असून सदर प्रक्रियेमध्ये असे निदर्शनास आले आहे की, API गुणांचे निर्धारण करतांना “Peer Reviewed” या मथळ्याखाली असलेल्या शोध निबंधांचे (Research Paper) गुण ग्राहय धरण्यात येत नाही आहे.
परंतु विद्यापीठ अनुदान आयोग २०१८ व ८ मार्च २०१९ महाराष्ट्र शासन नियमा अंतर्गत “Peer Reviewed” शोध निबंधांचे गुण ग्राहय धरण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहे. तथापी विद्यापीठाच्या अंतर्गत CAS प्रक्रियेत Peer Reviewed शोध निबंधाचे गुण ग्राहय धरण्यात आले नसल्यामुळे विद्यापीठातील बरेच प्राध्यापकांचे या कारणास्तव CAS संदर्भात अडचणी निर्माण झाल्या आहेत. सदरहू Peer Reviewed शोध निबंधाचे गुण ग्राहय धरल्यास या प्राध्यापकांच्या CAS संदर्भातील अडचणी दूर होतील या प्रसंगी शिक्षण मंचचे डॉ. संतोष कसबेकर, डॉ. संतोष गिऱ्हे, डॉ. सुरेश मसराव, डॉ. योगेश मुरकुटे, डॉ. गजानन पोलनवार, डॉ. निलेश रारोकर, डॉ. योगेश भुते व विद्यापीठातील अनेक प्राध्यापक उपस्थित होते.