Published On : Tue, Nov 6th, 2018

महावितरणच्या विभागिय कार्यालयाची उमरेडकरांची मागणी पुर्ण

नागपूर: राज्यात केंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती आणि एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत वीज वितरण यंत्रणा सक्षमीकरणासाठी तब्बल पाच हजार कोटींची विकासकामे सुरु असून ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र स्वयंपुर्ण होण्याच्या मार्गावर असल्याची माहीती राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

उमरेड, भिवापूर आणि कुही या भागातील वीज ग्राहकांची अनेक वर्षांपासूनची असलेली मागणी पुर्ण करीत महावितरणच्या उमरेड विभागिय कार्यालय नागपूर येथून उमरेड येथे स्थलांतरीत करण्यात आले असून या कार्यालयाचे उद्घाटनही ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उमरेड येथे करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. कृषीपंपांना 1.60 रुपये प्रति युनिटप्रमाणे वीजपुरवठा करण्यात येत असतांनाही त्यांचेकडे हजारो कोटींची थकबाकी आहे, तरीही त्यांचा वीजपुरवठा खंडित केला नसल्याचे सांगतांनाच मागिल चार वर्षात विदर्भातील तब्बल 7 लाख 58 हजार शेतक-यांना वीजजोडणी दिली असून उर्वरीत शेतक-यांना डिसेंबर अखेरपर्यंत वीजजोडणी देणार असल्याचेही त्यांनी यावेळि सांगितले.

महावितरण अभियंता आणि कर्मचार-यांनी यंत्रणेच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे विशेष लक्ष देण्याचि गरज असून राज्यात तब्बल 23 हजाराहून अधिक ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात येत असल्याचेही बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. नगरपरिषदेने सौरऊर्जेचा वापर केल्यास उमरेड शहरात भुमिगत वीजवाहिन्यांच्या प्रस्तावावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. शेतक-यांना दिवसा 10 ते 12 तास वीजपुरवठ्याबाबत स्वतंत्र नियोजन करावे लागेल त्यासाठि दिवाळी नंतर चर्चा करण्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलतांना खासदार कृपाल तुमाणे यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाच्या धडाक्याचे विशेष कौतून करतांना जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कार्य होत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. तर आमदार सुधीर पारवे यांनी यावेळी विभागात 3 तालुके आणि 500 गावे असून कधी नव्हे तर प्रथमच विभागात 12 नवीन वीजकेंद्रे उभारण्यात आली असून वीजेच्या बाबतीत विभाग स्वयंपुर्ण होत असल्याचे सांगितले. महावितरणच्या नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी आपल्या प्रास्ताविकातून विभागातील सुमारे 87 हजार ग्राहकांना या विभागाचा लाब होणार असून महावितरणची विभागात 30 ते 40 कोटींची कामे सुरु असल्याचि माहिती दिली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, खासदार कृपाल तुमाणे, आमदार सुधीर पारवे, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, प्रभारी मुख्य अभियंता (स्थापत्य) राकेश जनबंधू, जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा. गिरीश देशमुख, उमरेड नगर परिषदेच्या अध्यक्षा विजयलक्ष्मी भदोरीया, जिल्हा नियंत्रण समिती सदस्य आनंदराव राऊत, अधीक्षक अभियंता उमेश सहारे, मनिष वाठ, नारायण आमझरे, केशवराव ब्रम्हे यांचेसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.