Published On : Thu, Oct 14th, 2021

पंचशील ध्वजाने सजली दीक्षाभूमी

Advertisement

-भदंत ससाई आणि डॉ. फुलझेले यांनी केली पाहणी

नागपूर– धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीचा परिसर सजविण्यात आला. ठिकठिकाणी पंचशील ध्वज आणि रोषणाई करण्यात आली आहे. यंदा दीक्षाभूमीवर मुख्य सोहळा नसला तरी कोरोनाचा प्रभाव ओसरल्याने आणि राज्य शासनाने धार्मिक स्थळे सुरू करण्याची परवानगी दिल्याने अनुयायी येतील.

त्यांच्यासाठी दीक्षाभूमीची दारे उघडण्यात आली. या संपूर्ण तयारीचा आढावा आणि पाहणी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई आणि सचिव डॉ. सुधीर फुलझेले यांनी बुधवारी दुपारी केली.

कोरोनाचा प्रार्दुभाव लक्षात घेता धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम रद्द केला असला तरी दीक्षाभूमीची परंपरा कायम ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार गुरूवार १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता भिक्खु संघ व स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पंचशील ध्वजारोहण होईल. तसेच १५ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या उपस्थितीत बुद्ध वंदना घेऊन बाबासाहेबांना मानवंदना देण्यात येईल.

या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली आहे. अखेरची पाहणी करण्यासाठी बुधवारी दुपारच्या सुमारास भदंत ससाई आणि डॉ. फुलझेले यांनी संपूर्ण दीक्षाभूमी परिसर, स्तूपाच्या आत, मुख्य प्रवेशव्दार आणि इतर आवश्यक ठिकाणांची पाहणी करून संपूर्ण तयारीचा आढावा घेतला.

कोविड नियमांचे पालन करूनच अनुयायांना दीक्षाभूमीच्या आत प्रवेश देण्यात येणार आहे. अनुयायी येणार असल्याने मनपातर्फे नियंत्रण कक्ष आणि कोविड तपासणी बुथ सुरू करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे स्वच्छता ठेवण्यात आली आहे. दीक्षाभूमी मार्गावर तात्पुरते नळ सुरू करण्यात आले आहे. मात्र, दीक्षाभूमी आणि आजूबाजूच्या परिसरात कुठेही भोजनदानाचा कार्यक्रम नाही. कुठलीही दुकाने आणि स्टॉल्स नाहीत, दीक्षाभूमीपासून बèयाच अंतरावर बुध्द आणि आंबेडकरी साहित्य विक्रेते दिसून आले.

बेझनबागेत धम्मसोहळ्याची तयारी
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बेझनबाग मैदान येथे धम्मदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष व धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे. त्यानुषंगाने बेझनबाग मैदानावर स्टेज सजावट सुरू आहे. मैदानाच्या सभोवताल पंचशील ध्वज लावण्यात आले आहेत. भिक्खु संघासाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.