Published On : Thu, Jun 10th, 2021

हिवरीनगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण

Advertisement

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या हिवरीनगर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण गुरुवारी (१० जून) रोजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, उपमहापौर श्रीमती मनीषा धावडे, मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर मनपाच्या या आरोग्य केंद्रामध्ये फर्निचर, संगणक आणि टी.व्ही.ची व्यवस्था टाटा ट्रस्टच्या माध्यमाने करण्यात आली आहे. मनपातर्फे डॉक्टर्स, नर्सेस, फार्मासिस्ट आणि लॅब टेक्नीशियनची सुविधा देण्यात आली आहे. मनपातर्फे औषधीसुध्दा नि:शुल्क दिली जाणार आहे. गरोदर माता, ज्येष्ठ नागरिक आणि बी.पी.एल. धारक नागरिकांना मोफत सुविधा दिली जाणार आहे.

महापौर श्री. तिवारी यांनी नागरिकांना आरोग्य सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, गोरगरीब नागरिकांना या आरोग्य केंद्राचा लाभ होईल. मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता आरोग्य केंद्राच्या पहिल्या माळयावर ऑक्सीजन बेड्सची सुविधा करण्याचे निर्देश दिले.

यावेळी दुर्बल घटक समिती सभापती श्रीमती कांता रारोकर, लकडगंज झोन सभापती श्रीमती मनीषा अतकरे, ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, पुरुषोत्तम हजारे, नगरसेवक धर्मपाल मेश्राम, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.संजय चिलकर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार व डॉ. विजय जोशी, डॉ. टिकेश बिसेन, लकडगंज झोन सहायक आयुक्त साधना पाटील, टाटा ट्रस्टच्या डॉ. श्रुती आंडे, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी वाघमारे उपस्थित होते.

मनपातर्फे ह्या केन्द्रावर बाहयरुग्ण तपासणी, प्रसूतीपूर्व तपासणी, बाल रोग तपासणी, कुटुंब कल्याण समुपदेशन, कुष्ठरोग व क्षयरोग तपासणी, हिवताप व हत्तीरोग निदान व उपचार, रक्तदान, मधुमेह तपासणी व उपचार, औषधी आदीची व्यवस्था करण्यात आली आहे.