Published On : Fri, Sep 25th, 2020

मोक्षधाममधील पर्यावरणपूरक शवदहन व्यवस्थेचे लोकार्पण

परिसरातील नागरिकांना धूरापासून दिलासा : शहरातील पहिलाच प्रकल्प

नागपूर : शहरातील प्रभाग १७ अंतर्गत मोक्षधाम घाट येथे पर्यावरणपूरक शवदहन व्यवस्थेचे गुरूवारी (ता.२४) महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, नगरसेविका लता काटगाये, हर्षला साबळे, नगरसेवक विजय चुटेले, कार्यकारी अभियंता अजय मानकर, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे, राकेश भोयर, मिथुन बोंदले, अभय बावने आदी उपस्थित होते.

मोक्षधाम घाटावर पर्यावरणपूरक शवदहन व्यवस्था उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. घाटावर शवदहनानंतर निघणा-या धुरामुळे परिसरातील नागरिकांना त्रास व्हायचा, या प्रकल्पामुळे तो आता होणार नाही. मोक्षधाम घाटावरील धुररहित पर्यावरणपूरक शवदहन प्रकल्प हा नागपूर शहरातील पहिला प्रकल्प आहे. यासाठी आमदार प्रवीण दटके यांनी विशेष प्रयत्न केले होते.

सदर प्रकल्पासाठी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे यांनी पुढाकार घेत २.५० कोटी निधी मंजूर केला होता. त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात मोक्षधाम घाटावर ७ पर्यावरणपूरक शवदहन कक्ष तयार करण्यात आले आहेत. या ७ कक्षांचे महापौर संदीप जोशी यांनी लोकार्पण केले. लवकरच दुस-या टप्प्यातील ७ शवदहन कक्षांची निर्मिती केली जाणार आहे, अशी माहिती मनपाचे क्रीडा समिती सभापती तथा स्थानिक नगरसेवक प्रमोद चिखले यांनी दिली.