Published On : Thu, Jul 10th, 2025
By Nagpur Today Nagpur News

ठरलं! १८ जुलैला राज ठाकरे यांची मिरा रोडमध्ये सभा; मराठी-अमराठी वादावर पुन्हा एकदा मनसे आक्रमक

Advertisement

राज्यात सध्या हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीविरुद्ध अनेक पक्ष आणि संघटना आवाज उठवत आहेत. मनसेने या विरोधात आक्रमक पवित्रा घेत मोठं आंदोलन उभारलं आणि त्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) देखील या लढ्यात सहभागी झाला. परिणामी, राज्य सरकारने त्रिभाषा सूत्रासंदर्भातील दोन्ही शासन निर्णय (जीआर) मागे घेतले.

या पार्श्वभूमीवर ५ जुलै रोजी मुंबईत एक विजयी मेळावा पार पडला, ज्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर आले. या ऐतिहासिक भेटीनंतर ठाकरे आणि राज ठाकरे युतीबाबत चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

दरम्यान, मिरा-भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका मिठाई विक्रेत्यास मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिल्याची घटना घडली. यानंतर अमराठी व्यापाऱ्यांनी निषेधार्थ मोर्चा काढला. मनसेने या मोर्चाला भाजप प्रायोजित असल्याचा आरोप करत, मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला. याला प्रत्युत्तर देत, ८ जुलै रोजी मनसेने मिरा-भाईंदरमध्ये भव्य मोर्चा काढला, ज्याला प्रचंड जनसमर्थन मिळाले.

या सर्व घडामोडींनंतर आता १८ जुलै रोजी राज ठाकरे मिरा रोड येथे सभा घेणार आहेत. मनसेकडून ही “आभार सभा” असल्याचं सांगितलं जात असलं तरी, या सभेत राज ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मराठी विरुद्ध अमराठी वाद, त्रिभाषा धोरण, आणि भाजपवर संभाव्य टीका – हे विषय पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

Advertisement

राज ठाकरे यांची ही सभा राज्यातील आगामी राजकीय समीकरणांसाठी ठराविक दिशा दाखवणारी ठरू शकते. त्यामुळे ही सभा केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित न राहता, राज्याच्या राजकारणाला नवसंजीवनी देणारी ठरेल, अशी चर्चा रंगत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.