नागपूर : शहरातील गजबजलेल्या संत्रा मार्केटमध्ये हातगाडी विक्रेत्यांतील वादातून एका तरुणाची दिवसा ढवळ्या निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (२१ जानेवारी) घडली. ही घटना तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, घटनेनंतर संपूर्ण बाजारपेठेत एकच खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संत्रा मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्या हातगाडी विक्रेत्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि याच दरम्यान एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी व ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळताच तहसील पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराचा बंदोबस्त करत पंचनामा केला. तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
दिवसा वर्दळीच्या बाजारात घडलेल्या या हत्याकांडामुळे शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.
या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मृत तरुणाची ओळख आणि हल्लेखोरांविषयी अधिकृत माहिती मिळणे बाकी आहे. पुढील तपास सुरू असून, लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.









