Published On : Tue, Aug 4th, 2026
By Nagpur Today Nagpur News

प्रफुल गुडधे यांनी 48 तासांत माफी मागावी, अन्यथा मानहानीचा दावा – दयाशंकर तिवारी

Advertisement

नागपूर: भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल गुडधे यांना सार्वजनिक माफी मागण्याचा इशारा दिला आहे. गुडधे यांनी 48 तासांच्या आत माफी मागितली नाही, तर प्रतिमाहानीप्रकरणी त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला जाईल, असे तिवारी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दयाशंकर तिवारी म्हणाले की, काही दिवसांपूर्वी प्रफुल गुडधे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात विविध आरोप केले होते. त्यानंतर भाजपची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आपण पत्रकार परिषद घेतली होती आणि हे सर्व आरोप निराधार असल्याचे सांगितले होते.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

त्यानंतर प्रफुल गुडधे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. त्या परिषदेतील राजकीय भूमिकेवर भाष्य करायचे नसले तरी त्यांच्या काही सार्वजनिक वक्तव्यांमुळे त्यांच्या विचारसरणीबाबत प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा तिवारी यांनी केला.

तिवारी यांनी सांगितले की, नुकतेच नागपूरचे नवीन पोलीस आयुक्त पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यासाठी गेलेल्या प्रफुल गुडधे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, “मी अर्बन नक्षल असल्याने पोलीस आयुक्त माझा एन्काऊंटर करतील,” असे वक्तव्य केले होते. या विधानाचा अर्थ नागरिक स्वतः लावू शकतात, असे ते म्हणाले.

Advertisement

याशिवाय, एका वृत्तवाहिनीवरील तसेच फेसबुकवरील मुलाखतीत प्रफुल गुडधे यांनी आपला उल्लेख करताना केलेल्या हातवाऱ्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराचा सूचक आभास निर्माण करण्यात आला आणि त्यामुळे आपली सार्वजनिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप तिवारी यांनी केला.

दयाशंकर तिवारी यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाचा उल्लेख करत सांगितले की, 1997 पासून नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर म्हणून काम करताना त्यांनी पारदर्शक राजकारण केले आहे. रस्ता रुंदीकरणामुळे वडिलोपार्जित घर पाडण्यात आले असून सध्या आपण झिंगाबाई टाकळी येथे भाड्याच्या घरात वास्तव्यास असल्याचेही त्यांनी नमूद केले.

राजकारणात मतभेद आणि टीका-टिप्पणी होऊ शकते, मात्र कोणत्याही व्यक्तीच्या चारित्र्यावर किंवा सार्वजनिक प्रतिमेवर आधारहीन संकेत देणे योग्य नसल्याचे सांगत तिवारी यांनी प्रफुल गुडधे यांनी 48 तासांत सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा कायदेशीर मार्गाने मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला.

या पत्रकार परिषदेला भाजपचे सत्तापक्षनेते बाल्या बोरकर, शहर महामंत्री श्रीकांत आगलावे, रितेश गावंडे, संदीप जाधव, मनीषाताई धावडे, संपर्क महामंत्री विष्णू चांगदे, तसेच पवन तिवारी आणि वैभव बावनकर उपस्थित होते.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.