Published On : Thu, Sep 21st, 2017

दाऊदला स्वतः भारतात यायचंय, मात्र मोदी श्रेय लाटणार : राज ठाकरे

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला स्वतःहून भारतात येण्याची इच्छा आहे, मात्र मोदी सरकार आपण त्याला पकडून आणल्याचं सांगत श्रेय लाटणार असल्याचा सनसनाटी आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला.

एफबी पेजच्या लाँचिंगवेळी मुंबईतील रविंद्र नाट्यमंदिरात केलेल्या भाषणात राज यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केला.

‘दाऊद इब्राहिमला स्वतःहून भारतात येण्याची इच्छा आहे. हा विनोद नाही. दाऊद विकलांग झाला असून त्याला भारतात येऊन मातृभूमीत अंतिम श्वास घ्यायचा आहे. त्यासाठी तो केंद्र सरकारसोबत सेटलमेंट करण्याच्या तयारीत आहे’ असं राज ठाकरे म्हणाले.

‘भारतात येण्याची त्याची इच्छा आहे, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आपण दाऊदला पकडून भारतात आणल्याचा डंका पिटणार’ असं राज म्हणाले. बॉम्बस्फोटाला इतकी वर्ष झाली, इतक्या वर्षात काँग्रेसला जे जमलं नाही, ते आम्ही केलं, दाऊदला आमच्या पंतप्रधानांनी पकडून आणलं, असा दावा भाजप करणार आणि श्रेय लाटून आगामी निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी त्याचा फायदा करुन घेणार, असा खळबळजनक आरोप राज ठाकरे यांनी केला.

राज ठाकरेंची फेसबुकवर थेट ‘व्हेरिफाईड’ एण्ट्री

राज ठाकरे यांनी अधिकृतरित्या फेसबुकवर पदार्पण केलं. मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिरात एका भव्य सोहळ्यात राज ठाकरे यांचं फेसबुक पेज लाँच करण्यात आलं. व्यंगचित्र, कामं, मतं, धोरणं आणि लोकांशी संवाद साधण्यासाठी या फेसबुक पेजचा वापर केला जाईल, असं राज ठाकरे म्हणाले