Published On : Sun, Aug 6th, 2023
By Nagpur Today Nagpur News

दत्ताजी डिडोळकर यांनी विचारांशी तडजोड केली नाही

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : स्व. दत्ताजी डिडोळकर जन्म शताब्दी समारोहाचे उद्घाटन
Advertisement

नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि विद्यार्थी-युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्व. दत्ताजी डिडोळकर यांनी आयुष्यभर संघाचे विचार सोडले नाहीत. त्यांनी विचारांशी कधीही तडजोड केली नाही. पण त्याचवेळी संघविरोधी विचारांच्या लोकांसोबतही त्यांचे मधूर संबंध होते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री व दत्ताजी डिडोळकर जन्म शताब्दी समारोह समितीचे अध्यक्ष ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) केले. स्व. दत्ताजी डिडोळकर जन्म शताब्दी समारोहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राजशरण शाही, समितीचे सचिव व माजी खासदार अजय संचेती, संयोजक डॉ. मुरलीधर चांदेकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘अनेकांचे आधारवड’ या लघु पुस्तिकेच्या मराठी, हिंदी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन झाले. स्व. डिडोळकर यांच्या कार्याची माहिती देणाऱ्या संकेतस्थळाचेही लोकार्पण करण्यात आले. दत्ताजी कार्यकर्त्यांचे पालकत्व घ्यायचे, असे सांगत त्यांनी आठवणींना उजाळा दिला. दत्ताजी डिडोळकर नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभे राहायचे. अनेक कार्यकर्त्यांची बँक गॅरंटी तेच घेत असत. त्यांच्या घरी कार्यकर्तेच जास्त राहायचे. ते केवळ वैचारिक मार्गदर्शन करायचे नाही, तर संघटनेप्रति कटिबद्ध राहून कार्य करायचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रति त्यांची जीवननिष्ठा सर्वांनी बघितली आहे. आज जे काही आपल्याला मिळाले आहे, ते स्व. दत्ताजींसारख्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांच्या संघर्षामुळे मिळालेले आहे,’ असे ना. श्री. गडकरी म्हणाले. ज्या काळात प्रतिष्ठा नव्हती, सन्मान नव्हता, त्याही काळात दत्ताजींकडून प्रेरणा घेऊन आम्ही कार्य करीत होतो, असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘विद्यार्थी परिषदेला राष्ट्रीय संघटना म्हणून लौकिक मिळवून देण्यात स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे जीवन संघाच्या संस्काराने परिपूर्ण होते. दत्ताजींच्या गुणांमुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रत्येकावर प्रभाव पडायचा. समर्पण, सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये होती.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दत्ताजींचे समर्पण प्रतिबिंबित व्हावे – दत्तात्रय होसबळे
महान राष्ट्राच्या भविष्यासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी ज्यांनी जीवन समर्पित केले, त्यांचे कार्य, आदर्श आपल्यामध्ये प्रतिबिंबित झाले पाहिजे. तरच स्व. दत्ताजींसारख्या महान कार्यकर्त्यांच्या जन्मशताब्दी समारोहाचे औचित्य साध्य होईल, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह श्री. दत्तात्रय होसबळे यांनी व्यक्त केले. कार्यकर्त्यांसोबत मिळूनमिसळून राहण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्यापेक्षा कमी वयाच्या लोकांना पण दत्ताजी मित्रत्वाची वागणूक देत असे, असेही ते म्हणाले. त्यांनी स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. दत्ताजींचे स्मरण म्हणजे एका विचाराचे स्मरण करणे होय. त्यांच्या कार्याचे स्मरण करणे होय. ते एका विचाराचे वाहक होते. जीवन कसे जगायचे, याचा आदर्श होते. आपण त्या आदर्शाला, कार्यपद्धतीला आपल्या जीवनात आणत आहोत. त्यामुळे आपल्यासाठी ही व्यक्तीपूजा नाही, असेही दत्तात्रय होसबळे म्हणाले.

वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन
स्व. दत्ताजी डिडोळकर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्थापनेच्या काळातील अग्रणी कार्यकर्ते होते. कन्याकुमारी येथील स्‍वामी विवेकानंद शिला स्‍मारकाच्या संकल्पनेत त्यांची प्रमुख भूमिका होती. ते राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे दक्षिणेतील पहिल्या फळीतील प्रचारक व विद्यार्थी होते. तरुणांचे प्रेरणास्‍थान राहिलेले स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष ७ ऑगस्‍ट २०२३ ते ७ ऑगस्‍ट २०२४ या कालावधीत साजरे होणार आहे. यादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement