Published On : Fri, Oct 27th, 2017

सायबर हल्ला टाळण्यासाठी महाराष्ट्र सायबरच्या सूचना जारी

Advertisement

Cyber Attack
मुंबई: जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांच्या उपकरणांवर रिपर किंवा लो ट्रुप या बॉटनेटचा वापर करून सायबर हल्ला होण्याची शक्यता आहे. यामुळे वायफाय राऊटर्स, सीसीटीव्ही कॅमेरा आदी उपकरणांना धोका पोहचू शकतो. त्यामुळे या हल्ल्यापासून वाचण्यासाठी इंटरनेट वापरणाऱ्यांनी आपल्या इंटरनेट आधारित उपकरणांचे पासवर्ड बदलून ते अधिक कठिण स्वरुपाचे ठेवण्याच्या सूचना महाराष्ट्र सायबरने केले आहे.

जगभरातील सायबर तज्ज्ञांना रिपर नावाचा बॉटनेटचा वापर करून सायबर हल्ला होण्याची शक्यता असल्याचे आढळले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी नागरिकांनी उपाय योजण्याचे आवाहन केले आहे.

हा वायरस बॉटनेटचा वापर करून इंटरनेट आधारित उपकरणांवर ताबा मिळविणाऱ्या व वापरकर्त्यांची माहिती चोरी करणाऱ्या ‘मिराई’ व्हायरस पेक्षाही मोठा हल्ला ‘रिपर’द्वारे होण्याची भीती आहे. याबाबत महाराष्ट्र सायबरने सावधगिरीची आणि प्रतिबंधात्मक कृती करण्याचा सल्ला दिला असून या हल्ल्यापासून सावध राहण्यासाठी काय उपाय योजावेत यासंबंधीची माहिती राज्य पोलीस दलाच्या सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी दिली आहे.

Advertisement
Advertisement

काय होणार हल्ल्यामुळे?
बॉटनेटच्या या हल्ल्यात इंटरनेटवर आधारित वायफाय राऊटर, इंटरनेटवर जोडलेले सीसीटीव्ही कॅमेरे, स्टोरेज बॉक्स आदींना हानी पोहचू शकते. त्यातून हॅकर्स वापरकर्त्यांची माहिती चोरून गैरवापर करू शकतात.

उपाय योजना
या सायबर हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी पुढील उपाय केले पाहिजे –
1. इंटरनेट आधारित सर्व उपकरणांचे पासवर्ड बदलावे
2. तसेच पासवर्ड बदलतांना त्यात एक अंक, चिन्हे, इंग्रजीचे मोठी अक्षरे, इत्यादींचा वापर करून तुमचा पासवर्ड भक्कम बनवावा.
3. ज्यांनी आपल्या उपकरणाचे ‘फर्मवेअर’ अपडेट केले नाही, त्यांनी ते लवकरात लवकर करून घ्यावेत.
4. सर्व नेटवर्कसाठी मजबूत एन्क्रिप्शन सिफरसारख्या सर्वोत्तम पद्धतींचा वापर करावा
5. वापरात नसलेल्या सेवा बंद करून नॉन-क्रिटिकल नेटवर्क एक्सप्लोरर कमी करावे.
6. आपल्या डिव्हाइसमध्ये संशयास्पद काही दिसू लागल्यास तर आपण फॅक्टरी रिसेटद्वारे मालवेयर हे घालवू शकतो. त्यामुळे फॅक्टरी रिसेट करावे.

काय आहे बॉटनेट?
बॉटनेट हा शब्द रोबोट आणि नेटवर्कचा एक संयोजन आहे. वास्तविक स्वरूपात, हे इंटरनेट कनेक्टेड डिव्हाइसेस, जसे की पीसी, सर्व्हर्स, मोबाईल डिव्हाइसेस आणि इंटरनेटवरील वस्तूंचे संकलन आहे जे धोकेबाज किंवा हल्लेखोरांच्या गटाद्वारे दूरस्थपणे संक्रमित होतात. बोटेनेटचा हेतू ईमेल स्पॅम आणि डीडीओचे आक्रमण करणे आहे.

कसे कार्य करते बॉटनेट?
हॅकर्स हे मालवेअरच्या सहाय्याने एखाद्या उपकरणांवर नियंत्रण मिळवतो आणि त्याद्वारे हे इंटरनेटद्वारे जोडलेल्या इतर उपकरणांमध्ये शिरतात. त्यानंतर ते व्हायरस असलेले कोड इतर संगणक अथवा उपकरणावर पाठवितात. त्यानंतर त्या उपकरणावर संपूर्ण ताबा मिळवून त्यातून त्यांना हवी असलेली वापरकर्त्यांची माहिती चोरतात व हानी पोहचवू शकतात.

रिपर बॉटनेट म्हणजे काय?
‘रिपर’ हा बॉटनेट आधुनिक तंत्र वापरून कमजोर पासवर्ड असलेल्या वायरलेस आयपी कॅमेरा, राऊटर्स आदीसारख्या उपकरणांमध्ये शिरतो. त्यातून हॅकर्स हे इंटरनेट आधारित इतर उपकरणांची सुरक्षा तोडण्यासाठी या ‘रिपर’चा उपयोग करतात. त्यामुळे या सायबर हल्ल्यापासून वाचण्यासाठी नागरिकांनी आपल्या सीसीटीव्ही कॅमेरे, राऊटर्स आदी इंटरनेटशी जोडलेल्या उपकरणांचे पासवर्ड बदलून काळजी घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग रजपूत यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement