Published On : Mon, Nov 8th, 2021

नागपुरातील पत्रकार सहनिवासच्या नाल्यात मगरीचा मुक्काम!

नागपूर: अलिकडे वाघ आणि बिबट्याचा वावर कमी झाला म्हणून की काय नागपुरात आता मगर मुक्कामाला आली आहे. तीही धरमपेठेतील पत्रकार सहनिवासाला लागून असलेल्या नाल्यामध्ये. ही मगर थोडी पाण्याच्या वर येऊन आराम करीत असताना काही स्थानिक मुलांना दिसली. त्यांनी तिचा व्हीडीओ काढून व्हायरल केला.

मानद वन्यजीव रक्षक अविनाश लोंढे व कुंदन हाते यांनी याला दुजोरा दिला. काही दिवसांपूर्वी झालेल्या तुफानी पावसात वेणा नदीतून जुळलेल्या नाल्यातून मगर आली असावी असा कयास हाते व लोंढे यांनी व्यक्त केला.


नाल्यात मगर असल्याची तक्रार मिळाल्या नंतर वनविभागाची टिम दोन तीनदा घटनास्थळावर जाऊन आली. परंतु या टिमला मगर आढळली नाही. वनविभागाची चमू घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. या मगरीचा थेट नागरिकांशी संबंध नाही आणि त्यांना त्रासही नाही. त्यामुळे आली तशी ती काही दिवसांनी निघून जाईल, असे लोंढे यांनी सांगितले.