
नागपूर : नागपूर शहरात जुगाराच्या अड्ड्यांविरोधात कारवाई करत गुन्हे शाखा आणि यशोधरानगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने भिलगाव येथील ऋतुराज टाउन परिसरात छापा टाकला. दुर्गा मंडपाच्या मागे सुरू असलेल्या जुगारावर करण्यात आलेल्या या कारवाईत आठ जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख रकमेसह सात मोबाईल आणि पत्त्यांची पाने असा एकूण ८७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
रात्रीच्या गस्तीदरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये यशोधरानगर पोलीस ठाण्याचे पथक, गुन्हे शाखेचे युनिट क्रमांक ३ व ५ आणि वाहनचोरी विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
या कारवाईत विनीज विनोद मेहरुनिया, शाहरुख अंसारी अब्दुल जब्बार अंसारी, अस्मित रितेश चरोटे, राहुल अशोक धामती, कुणाल ऊर्फ गोलू अशोक धामती, अश्विन तुलाराम गवरे, अरुण राम कुशवाह आणि प्रतीक संतोष सोनवणे यांना ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळावरून २६ हजार ८८० रुपये रोख, ६० हजार ६०० रुपये किमतीचे सात मोबाईल फोन आणि ५२ पत्त्यांची पाने जप्त केली. जुगार खेळल्याच्या आरोपावरून संबंधित आठ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यांना यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.



