नागपूर: विधानसभा निवडणुकीमध्ये नागपूर शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करावे याकरिता जनजागृतीसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे विविध अभियान राबविण्यात येत आहेत. नागपूर शहरात मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता भारत निवडणूक आयोगाचे ‘मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग’ अर्थात स्वीप कार्यक्रम अंतर्गत शहरात रांगोळी स्पर्धा घेण्यात येत आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठाणकर यांच्या संकल्पनेनुसार शहरात दिवाळीच्या दिवशी ३१ ऑक्टोबर ते ०२ नोव्हेंबर २०२४ रोजी महा निवडणूक- महा रांगोळी ही अभिनव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेंतर्गत स्पर्धकांना दिवाळीच्या दिवशी १ नोव्हेंबर २०२४ रोजी आपल्या घरी काढलेल्या रांगोळीचा फोटो माझे मत माझा अधिकार किंवा मेरा मत मेरा अधिकार किंवा My Vote My Right लिहून मनपाच्या electionnmc2017@gmail.com या ईमेल आयडीवर किंवा मनपाद्वारे जारी करण्यात आलेल्या क्यूआर कोडवर पाठवायचा आहे. सर्वोत्कृष्ट मतदार जनजागृती संदेश देणाऱ्या रांगोळीची विजेता म्हणून निवड करण्यात येणार आहे. विजेत्या स्पर्धकाला मनपातर्फे आकर्षक बक्षीस देखील प्रदान करण्यात येणार आहेत.
जास्तीत जास्त नागपूरकरांनी महा निवडणूक-महा रांगोळी या स्पर्धेमध्ये सहभागी होउन नागरिकांना मतदानाप्रती जागरूक करण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन उपायुक्त तथा सहायक नोडल अधिकारी (SVEEP) डॉ. रंजना लाडे यांनी केले आहे.